“लॉकडाउनाचा नियम मोडणार्‍यांना थेट करोना बाधितांच्या सेवेला पाठवा”


पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाने मुख्यमंत्र्यांना पाठवले मागणी पत्र


देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे. मात्र तरी देखील बहुसंख्य नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. आता अशा नागरिकांविरोधात पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी लॉकडाउन मोडणाऱ्या नागरिकांना करोना बाधित रुग्णांची सेवा करण्यास पाठविण्यात यावे, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3 मे पर्यंत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी बाहेर पडता कामा नये. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरी देखील प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनेकजण बाहेर पडत आहे. अशांना पोलीस प्रशासन मागील काही दिवसात उठाबशा, सूर्यनमस्कार, गाड्या जप्त करणे, गुन्हे दाखल करणे आणि काठीचा देखील प्रसाद देताना पाहिले आहे. तरी देखील नागरिक घरी बसताना दिसत नाही. अशाच काही नागरिकांमुळे पोलिस कर्मचारी देखील या आजाराचे बळी ठरले आहे.



या पार्श्वभूमीवर पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, आजपर्यंत लॉक डाउनबाबत प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्या आदेशाचे नागरिक पालन करताना दिसत नाही. आदेशाचे पालन न करणार्‍या नागरिकांवर गुन्हे आणि जागेवर शिक्षा देखील करण्यात आली आहे. मात्र तरी नागरिक बाहेर पडत आहे. आता बाहेर पडणार्‍या नागरिकांना करोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी पाठविले जावे, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढावा.
***