महाकवी वामनदादा कर्डक स्मृतिदिन विशेष .....!
आंबेडकर वादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक...
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 91 व्या जयंतीचे औचित्य साधून राहुल साबणे यांनी विभागीय स्तरावर वामनदादांच्या जीवनपटावर भाष्य करणारी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या निबंधांच्या परीक्षणांचे कार्य एम.डी. इंगोले यांनी केलेले आहे. प्रस्तुत निबंध हे ग्रंथ रूप आकारासाठी पुरेसे नसल्याने प्रा. डॉ. एम.डी. इंगोले यांनी मान्यवरांशी संपर्क करून वामनदादांविषयीचे आणखी लेख जमा करून 'आंबेडकर वादाचा भाष्यकार वामनदादा कर्डक' हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहे.
प्रस्तुत पुस्तकात के. व्ही. सरवदे, लीलाई ज्ञा. उजगरे, रेश्मा भरत जाधव, के. आर. वाघमारे, रा. दे. सूर्यवंशी यांच्या निबंधांच्या संकलनासह प्रा. डॉ. एम.डी. इंगोले, डॉ. यादव गायकवाड, प्रा. डॉ . सा. द. सोनसळे, प्रा . डॉ. भीमराव खाडे, प्रा. डॉ. सतीश म्हस्के, प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा. डॉ. सुभाष राठोड, प्रा. डॉ. संतोष हंकारे, प्रा. मारोती कोल्हे, डॉ. अनंत राऊत, प्रा. डॉ. भीमराव खाडे, प्रा. डॉ. अशोक जोंधळे, प्रा . सुहास गायकवाड - प्रा. गौतम वाघमारे, प्रा. महादू सरवदे यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या लेखासह वामनदादाच्या कार्यकतृत्वाची महती सांगणाऱ्या डॉ. आदिनाथ इंगोले यांची एक कविता व डॉ. देवराव रायभोळे यांच्या दोन कविता आपणाला या पुस्तकात वाचायला मिळतात. महाकवी वामनदादांचं गुणगान अधोरेखित करताना डॉ. आदिनाथ इंगोले म्हणतात,
भीम युगाचा तू । दादा महाकवी ।
गावी तुझी ओवी । जय भीम ।।
तुझे युगांतरी । गीत ओठावरी ।
तुला कांतीकारी । जय भीम ।।
वामनदादा कर्डक यांचे गाणे गाऊन आजही अनेक जण फुले आंबेडकर विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यास आयुष्य समीत करत आहेत. म्हणूनच देवराव रायभोळे म्हणतात, माझा वामन या कवितेतून -
माझा वामन वामन
कवीमंदी कोहिनूर
दीनदुबळ्या मिळाला
त्यांच्या गीतांचा आधार
तसेच वामनदादा कर्डक यांच्याविषयी सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले यांच्याशी प्रा. डॉ. एम. इंगोले यांनी केलेला संवाद ( मुलाखत ) समाविष्ट आहे.
के. व्ही. सरवदे यांनी लिहिलेल्या वामनदादा कर्डक ' एक महाकवी या लेखात वामनदादा कर्डक व्यक्तिमत्वाचे विविध पैलूंचे दर्शन घडते. त्यांनी अनेक दिग्गजांचा वामनदादांविषयी असलेला आदरभाव : संदर्भ नमूद केला आहे. लेखकाने लेखाचा शेवट लेखकाने 'शब्द आमुचे लुळे पांगळे' लिहिलेल्या कवितेतील ओळीने केलेला आहे. त्यातील काव्यपंक्ती पुढीलप्रमाणे आहेत.
तुझ्या 'वाटचाली' ने नि 'जीवन गाण्याने' मधाळ 'मोहळ' तू आम्हा अदा केले
तुझ्या शब्दसंपदे अन् रचनेपुढे, आमुचे शब्द मरतुकडे
दीन दुबळे नि लुळे पांगळे ! ...
ह्या काव्यपंक्तीध्ये लेखकाने भावविवश होऊन महाकवी वामनदादा कर्डक यांना आदरांजलीपर अर्पण केलेली भावपूर्ण शब्दांजली आहे.
प्रा. डॉ. अशोक जोंधळे यांनी वामनदादांविषयी हा बुध्द आंबेडकरी शिष्य वादळवारा होऊन समाजास सतत जागृत करीत राहीला' असे नोंदवून वामनदादा यांचे झालेले सत्कार - गौरव यांची नोंद अधोरेखित करण्याचा प्रयत्न गीतातून कांती घडविणारा सेनानी : वामनदादा कर्डक 'या लेखात केला आहे.
प्रा. डॉ. सा. द. सोनसळे 'महाकवी वामनदादांच्या जीवनाचं गाणं एक चिंतन ' ह्या लेखाने अस्वस्थता निर्माण होऊन समाजाने विधायक स्वरूपात आंबेडकरी कलावंतासाठी काही करण्याचं चिंतन करावे असा संदेश पेरला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी त्यांच्या लेखात नमूद केलेला प्रसंग वामनदादा लिहितात, " घरात काहीच नव्हतं, फक्त भात होता, माझी मीरा साखर मागत होती, मी साखरेचा रिकामा डबा उगीच भातावर फिरवीत होतो. माझं लेकरू चार दोन घास तसच खायचं, परत साखर मागायचं , परत तोच प्रयोग व्हायचा.... अखेर मीरा जगू शकली नाही. हा प्रसंग लेखकाने नमूद केलेला मनाला चटका लावतो.
"बहुजनांचे संपूर्ण जीवनच बदलून गेल्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वामनदादा आपल्या काव्यातून देताना दिसून येतात, असं निरिक्षण वामनदादा कर्डक यांच्या काव्यातून भीम प्रतिज्ञा ह्या लेखामध्ये प्रा. डॉ. एम.डी. इंगोले यांनी नोंदविले आहे.
" डॉ. यादव गायकवाड लिहितात वामनदादांची अनेक गाणी हा विषय माझ्यासाठी आपुलकी, जिव्हाळ्याचा झाला. नंतरच्या काळात हा विषय अभ्यासाचा चिंतनाचा झाला. त्यांच्या 'मासुळी बोले आपुल्या पिलाला - गीताचा अन्वयार्थ' या लेखात आपणाला वामनदादानी लिहिलेलं 'मासळी बोले आपुल्या पिलाला' हे संपूर्ण गाणंच वाचायला मिळतं. किंबहुना ह्या संपूर्ण गाण्यांवर लेखकांने समीक्षा - चिंतन करून आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा मागोवा घेऊन सामाजिक राजकीय वास्तावर भाष्य केलं आहे. ते लिहितात वामनदादाचे हे गाणे म्हणजे वास्तवाचा अन् कल्पनांचा एक देखणा मनोरम अविष्कार आहे.
वामनदादा कर्डक यांच्या काव्यातील प्रतिभा या लेखातून लीलाताई उजगरे यांनी त्यांच्या काव्यातील प्रतिभा उलगडून दाखविताना "प्रतिभावंत कवी वानदादा कर्डक" असा वामनदादा कर्डक यांचा गौरवपर उल्लेख केलेला आहे.
राहूल सूर्यवंशी, प्रा. डॉ. गौतम वाघमारे यांनी लिहिलेले लेख वेगळ्या धाटणीचे आहेत. व्यवस्था का विद्रोही कविः वामनदादा कर्डक हा डॉ. सुभाष राठोड यांचा हिंदी मधील एक लेख वाचकांना वाचायला मिळतो.
महाकवी वामनदादा कर्डक यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान मोठे आहेच. लेखकांकडून लेख जमा करून (लेखकांशी संपर्क करून) पुस्तक प्रकाशित करणे वाटते तितके सोपे नाही. संपादित पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय मोलाचे आहे. पुस्तकातील प्रत्येक लेख हा दर्जेदार आहे. परंतु समीक्षात्मक लिखाणामध्ये सर्वच लेखांचा उदापोह करणे शक्य नाही. पुस्तकाची मांडणी छपाई अतिशय सुबक झाली आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांचे 15 मे 2004 रोजी निधन झाले. त्यानंतर सदर पुस्तकाची प्रथम आवृत्तीचे 6 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशन करण्यात आलं आहे. पुस्तकामध्ये सर्वच लेखकांनी वामनदादांच्या आठवणी मांडल्या आहेत, वामनदादांविषयी आदरभाव व्यक्त केला आहे.
आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक ह्या पुस्तकाचे संपादन गंगाखेड, जि. परभणी येथील श्री संत जनाबाई शिक्षणसंस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मुंजाजी धुराजी इंगोले(प्रा. डॉ. एम.डी. इंगोले) यांनी संपादन केले आहे. पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु संग्राह्य ठरावे असेच आहे.
-सुभाष राघू आढाव. 244, लुंबिनी बाग, गोवंडी, मुंबई 400 043. मो. 9892060685
पुस्तकाचे नाव :- आंबेडकरवादाचा भाष्यकार महाकवी वामनदादा कर्डक संपादक :- प्रा. डॉ. एम.डी. इंगोले प्रकाशन अनुराधा पब्लिकेशन्स, सिडको, नवीन नांदेड मूल्य :- 160/- रू. एकूण पान :- 157
***