हिंगोली
शहरातील गांधी चौकात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संचारबंदी असताना झालेल्या वादात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि आयबीएन लोकमत टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत कन्हैया खंडेलवाल आणि ओमकांत चिंचोलकर दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत आयबीएन लोकमत टीव्हीचे कन्हैया खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ते वार्तांकन करण्यासाठी गांधी चौकात उभी असताना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी, ते पत्रकार आहेत की नाही याची चौकशी करण्यापूर्वी त्यांना मारहाण करणे सुरू केले. यानंतर काही पोलिस कर्मचाऱ्यांनी खंडेलवाल यांना मोठ्याप्रमाणावर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून ते सध्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ओमकार चिंचोलकर सुद्धा सामान्य रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संचारबंदी दरम्यान, कन्हैय्या खंडेलवाल हे गांधी चौकात आले आणि म्हणाले की तुम्ही आमच्या गल्लीतील मुलांना का रोखत आहात. मी आयबीएन लोकमतचा पत्रकार आहे, चिल्लर माणूस नाही. असे म्हणून खंडेलवाल व त्यांच्यासोबत आलेल्या तरुणांनी चिंचोलकर व पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चिंचोलकर यांना डोक्यात गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे हिंगोली शहरात कर्फ्यू दरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला झालेल्या महाराणीचा हिंगोली जिल्ह्यात पत्रकारांनी निषेध केला असून संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.