लॉकडाऊन काळात सोनू सूद हा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकते, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सामनामधील 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी सोनू सूद याने लॉकडाऊनच्या काळात मजुरांना केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे, ज्यामुळे तो हजारो मजुरांना घरी पोहचवू शकतो असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलंच आहे. पण त्यामागे कोणी 'राजकीय दिग्दर्शक' असण्याचीही शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं.
सोनू सूदला पुढे करून काही राजकीय घटक ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे, असं चित्र निर्माण करण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे, की लॉकडाऊनच्या काळात इतक्या बसेसची व्यवस्था झाली कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता आणि त्याला हवं ते मिळत होतं. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधानांच्या एखाद्या 'मन की बात'मध्ये येईल. मग दिल्लीत ते पंतप्रधानांच्या भेटीला निघतील आणि एक दिवस भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. संजय राऊतांच्या या टीकेवरुन राजकीय कलगीतुराही रंगला आहे.
***