आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल


तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत.


 
मुंबईः जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्याने तरुणाला १० ते १५ जणांनी मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनच्या काळातही खुद्द तरुणाला मंत्र्यांच्या बंगल्यात बोलावून ही मारहाण झाल्याने विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.


          जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून तरुणाला मारहाण केल्याचा भाजपानं आधीच निषेध नोंदवला आहे. त्यानंतर तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत. 
तरुणाच्या घरी जे गणवेशधारी पोलीस गेले होते ते त्या तरुणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले?, तरुणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानं धाब्यावर बसवले जात आहेत का?, पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्राच्या गुंडगिरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का?, त्या तरुणानं मंत्री महोदयांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच, पण त्याची वाट न बघता गृहनिर्माण मंत्र्यांचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी कायदा हातात घेणे सोयीचे समजले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही ना?, अशा प्रश्नांची उत्तरं भाजपानं जितेंद्र आव्हाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागितली आहेत. दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनीसुद्धा ट्वीट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे.


           गृहनिर्माणमंत्री @Awhadspeaks या प्रश्नांची उत्तरे द्यावीत – @Madhavbhandari_ महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन ठाण्यातील एका तरूणाला मारहाण केल्याचा आरोप आज केला गेला आहे. भारतीय जनता पक्ष या प्रकाराचा जाहीर निषेध करतो. (१/६) pic.twitter.com/DR19BB5Xfs— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 7, 2020 लाठी, काठी ,सळ्या व पोलिसांच्या जीवावर तुम्हाला तरी किती दिवस राज्य करता येणार?, असं ट्विट त्यांनी केलं आहे. लाठी, काठी ,सळ्या व पोलिसांच्या जीवावर तुम्हाला तरी किती दिवस राज्य करता येणार?@AwhadOffice pic.twitter.com/HBiA2hmcSn— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) April 7, 2020 तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.


            तसेच सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.


***