ऑटोचालकाने बक्षिसाची रक्कम राष्ट्रकार्यासाठी केली परत...

हिंगोली दि.२०:  येथील ऑटो चालवून उदरनिर्वाह करणारे गौतम उमाकांत साळवे यांनी बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नम्रपणे नकार देवून ही  रक्कम राष्ट्रकार्यास वापरण्यासाठी विनंती केली आहे.


       सोशल एज्यूकेशन मुव्हमेंटने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सर्व वयोगटातील सर्व समाजातील व्यक्तीसाठी व्हॉट्सअॅप व्दारे घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत गौतम ह्यांनी भाग घेवून विभागून आठवा विजेता क्रमांक पटकावला.  पण त्यांनी SEM चे जिल्हा संयोजक टी.एम.पोघे ह्यांना १९ रोजी संदेश पाठवून  व फोन करुन बँक तपशील देण्यास नम्रपणे नकार देवून बक्षिस प्राप्तीसाठी बॅक तपशील न देता ही रक्कम कोव्हिड १९ साठी महाराष्ट्र सरकारच्या खात्यात मदतनिधी म्हणून जमा करावी किंवा सोशल एज्यूकेशन मुव्हमेंट राबवित असलेल्या उपक्रमांतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करुन देण्याची विनंती केली.
         
       गौतम ह्यांचे शिक्षण १२ विज्ञान पर्यंत झाले असून त्यांनी गट क व ड साठी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत परंतू यशाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे अॅटो चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यामुळे पोघे यांनी  सध्या  अॅटोचालकाचा व्यवसाय बंद असून हातावर पोट असल्यामुळे बक्षिसाची रक्कम स्विकारण्याचा आग्रह केला.


    परंतू विजेत्यांच्या यादीत व वृत्तपत्रात माझे नाव छापून आले, शिवाय सेमच्या वतीने दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंती २०२१ समारोहात प्रमाणपत्र देवून माझा सत्कार होणार आहे हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे , असे म्हणत त्यांनी त्यांच्या बक्षिसाची रक्कम विधायक कार्यासाठी वापरण्याची विनंती केली. 
  SEM एसईएम ने त्यांचे "छोट्या माणसाचे मोठे मन" अशा एका वाक्यात त्यांचे कौतूक केले असून समाजातूनही त्यांचे कौतूक होत आहे .


***