ऑनलाइन साजरी होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती


पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच लॉकडाऊन कालावधी यामुळे यंदाच्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी होणारी 129वी जयंती घरातूनच साजरी करण्याचा निर्णय रिपब्लिकन युवा मोर्चाच्या आवाहनानंतर पुण्यातील जवळपास सर्वच पक्ष संघटनांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदाच्या भीम जयंतीच्या दिवशी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम पुणे शहरात होणार नाही.


दरम्यान, कोरोना संसर्ग वातावरणामुळे तयार झालेल्या भयानक परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मानसिकता उत्साही असणे आवश्यक आहे. हे वातावरण टिकून ठेवावे यासाठी कोरोना व्हायरस विरोधी संघर्ष करणाऱ्या सर्व संबंधितांनी प्रति यंदाी भिमजयंती समर्पित करून ऑनलाइन भीम जयंती करण्याचा मानस रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने निश्चित करण्यात आलेला आहे.


ऑनलाइन भीम जयंती च्या माध्यमातून निबंध, चित्रकला व प्रेस फोटोग्राफी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अद्याप ज्या नागरिकांना ऑनलाइन भीम जयंती स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी 98 22 91 71 19 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, आपले साहित्य dambalerahul@gmail.com या इमेल वर पाठवावे असे आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केले आहे.


सदर निवेदनाद्वारे रिपब्लिकन युवा मोर्चा कडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की 14 एप्रिल भीम जयंती ही पूर्णतः घरातूनच विविध उपक्रमांद्वारे साजरी करावी. ज्यात प्रामुख्याने पुस्तक वाचन, अठरा तास अभ्यास अभियान व टेलिव्हिजनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीशी संबंधित मालिका चित्रपट व माहितीपर कार्यक्रम पहावेत.


दरम्यान 14 एप्रिल रोजी दूरदर्शन वर जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट दाखवण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने केंद्रीय नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.


***