दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अशातच भारताने अमेरिकेसह इतर मित्र देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मदत केली आहे. तर आता अमेरिकेनेही मैत्रीला जागत भारताला 59 लाख डॉलरची आरोग्य मदत दिली आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेनं दिलेला निधी कोरोनाग्रस्तांची देखभाल, समाजाला आवश्यक आरोग्यसेवा पुरवणं आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी वापरला जाणार आहे. या निधीचा उपयोग आपत्कालीन तयारी आणि जागतिक महारोगराईशी दोन हात करण्यासाठी केला जाणार आहे.
अमेरिकेकडून 20 वर्षांपासून भारताला मदत देण्यात येत असून, जवळपास 2.8 अब्ज डॉलरच्या एकूण सहाय्यतेचा हा निधी एक भाग आहे. त्यामध्येच 1.4 अब्ज डॉलरच्या आरोग्य मदतीचाही समावेश आहे. दक्षिण आशियातील अनेक देशांना अमेरिकेनं कोरोनाला थोपवण्यासाठी मदत निधी दिलेला आहे.
***