शिक्षण विभागाकडून १० वी आणि १२वीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न


मुंबई : कोरोनाच्या संकटाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरही झाला असल्याने या दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेत लागणार का? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये काहीशी चिंता आहे. मात्र दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लावण्याचा शिक्षण विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून या महत्वाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा येऊ नये याची काळजी घेत आहे. याबाबतचे वृत्त झी 24तास वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.


ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षे दरम्यानच राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे या दोन्ही परीक्षांवर याचा परिणाम पाहिला मिळाला. सुदैवाने कोरोनाचे संकट येण्याआधीच बारावीची परीक्षा पार पडली होती. तर दहावीचा भूगोलाचा पेपर सोडून अन्य सर्व विषयांची परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच पूर्ण झाली होती. पण शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली.


मात्र आता या दोन्ही वर्षांचे निकाल वेळेत लागणार का ? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. यावर शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहचल्या आहेत. बारावीच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पोहचल्या असून बहुतांश उत्तरपत्रिका तपासूनही झाल्या आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


तर दहावीच्या इतिहास वगळता सर्व उत्तरपत्रिका या शिक्षकांपर्यंत पोहचवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या महत्वाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडथळा येऊ नये याची शिक्षण विभाग काळजी घेत आहे.
***