कोरोनानं जगाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. संपूर्ण जग ठप्प आहे आयात - निर्यात ठप्प आहे. उत्पादन बंद, तयार उत्पादनाला उठाव नाही, अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेलाही आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की कोरोना या संसर्गाच्या आजाराचा परिणाम देशाच्या भविष्यकाळात त्याचा परिणाम करणार आहे. लॉकडाऊनचा थेट परिणाम देशाच्या आर्थिकस्थितीवर होणार आहे. एका अंदाजानुसार कोरोना या संसर्गाच्या आजाराचा जागतिक उत्पादन, पुरवठा, व्यापार आणि पर्यटनावर येणाऱ्या भविष्यकाळात विपरित परिणाम होणार आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या चलनविषयक धोरण अहवालात नमूद केले आहे.
आरबीआयचा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात लागू झालेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनने १६ व्या दिवसात प्रवेश केला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, कोरोनोव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांवर याचा तीव्र परिणाम झाला आहे. कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी २०२० - २१ पर्यंत आर्थिक विकासाचे दृष्टीकोन तयार केला गेला होता. परंतु कोरोनाच्या साथीने हा समज पूर्णपणे बदलला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की कोरोनाची तीव्रता, व्याप्ती आणि कालावधी संबंधित परिस्थितीचे सध्या मूल्यांकन करण्याचे काम सुरु आहे. कोरोना विषाणूमुळे अंमलात आणलेले लॉकडाउन आणि जागतिक उद्योग व्यवसायात आलेली मंदी यामुळे निश्चितच देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर याचा मोठा परीणार येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा परिणाम थेट महागाईवर होणार आहे. पुरवठ्यातील अडचणींमुळे अन्नपदार्थाच्या किंमती घसरतील आणि बिगर खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना विषाणूच्या साथीमुळे बर्या च अर्थशास्त्रज्ञांनी जगभरातील निर्यातीवर बंधने येण्याचा इशारा दिला आहे, महत्त्वपूर्ण म्हणजे देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा आता वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते गुरुवारी देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढून १७८ झाली आहे. आणि संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या ५९१६ वर पोचली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की ५३२२ लोक अद्याप संक्रमित आहेत, तर ५०६ लोक बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
***