वैद्यकिय सेवेचा विजय : 70 कोरोनाबाधीत रुग्ण ठणठणीत : घरी सोडले 60 वर्षावरील व मधुमेह, उच्च रक्तदाब असणार्‍यांची विशेष काळजी विश्‍लेषणातून अधोरेखीत

 



वैद्यकिय सेवेचा विजय : 70 कोरोनाबाधीत रुग्ण ठणठणीत : घरी सोडले
60 वर्षावरील व मधुमेह, उच्च रक्तदाब असणार्‍यांची विशेष काळजी विश्‍लेषणातून अधोरेखीत 



मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यातील उच्चतम आणि उत्कृष्ट असलेल्या वैद्यकिय सेवेतील विविध घटकांच्या अथक परिश्रमातुन आणि यशस्वी उपचाराअंती आतापर्यत 70 कोरोनाबाधीत रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, आशासेविका आदींचे अहोरात्र मेहनत, त्यागाची भावना, रुग्णांना बरे करण्याची जिद्द व सकारात्मक मानसिकता आणि राज्यातील जनतेचा सरकारवरील खंबीर विश्‍वास या सार्‍यांच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्र राज्य कोरोना संकटातुन लवकरच मुक्त होईल अशी आशा निर्माण झाली आहे. अर्थात या 70 कोरोनाबाधीत रुग्ण ठणठणीत बरे होणे म्हणजे राज्याच्या वैद्यकिय सेवेचा विजयच असल्याची प्रतिक्रिया जनतेमधुन ऐकायला मिळत आहे. याबरोबरच कोरोनाने मृत्यु झालेल्यांच्या विश्‍लेषणानुसार 60 वर्षावरील व मधुमेह, उच्च रक्तदाब असणार्‍यांची विशेष काळजी घेण्याची गरजही या विश्‍लेषणात अधोरेखीत करण्यात आली आहे.
 राज्यात आज (दि.6 एप्रिल) कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या 868  इतकी झाली आहे. त्यापैकी 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17 हजार 563 नमुन्यांपैकी 15 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498  जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


      निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्यक्तींपैकी 8 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशिममधील आहे. 
 राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर (समुह) सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 71 तर बुलढाणा जिल्ह्यात 147 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2855 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. 
  दरम्यान कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 52 झाली असून राज्यात कालपर्यंत झालेल्या 45 मृत्यूंच्या विश्लेषणातून पुढील महत्त्वपूर्ण निष्कर्ष निघतात. 1) एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण (73 %) एवढे आहे. 2) 45 वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून साधारणपणे म्हणजे 60% मृत्यू हे 61 वर्षावरील व्यक्तींचे आहेत. 3) कालपर्यंत झालेल्या एकूण 45 मृत्यूंपैकी साधारणपणे 78 टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते. 4) 60 वर्षांवरील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असणार्‍या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे.