CoronaVirus : राज्याची विभागणी तीन झोनमध्ये ; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय coronavirus कोरोना रुग्णसंख्येच्या आधारे राज्याची तीन झोनमध्ये विभागणी


मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवल्यानंतर आता राज्य सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे . रेड , ऑरेंज , ग्रीन अशा तीन झोनमध्ये राज्यातल्या जिल्ह्यांची विभागणी झाली असून त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत . रुग्णसंख्येनुसार राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे . त्यानुसार मुंबई , पुणे , ठाणे , पालघर , नागपूर , रायगड , सांगली , औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे . तर रत्नागिरी , सिंधुदुर्ग , सातारा , कोल्हापूर , नाशिक , अहमदनगर , जळगाव , उस्मानाबाद , बीड , जालना , हिंगोली , लातूर , अमरावती , अकोला , यवतमाळ , बुलढाणा , वाशिम , गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे . ग्रीन झोनमध्ये धुळे , नंदुरबार , सोलापूर , वर्धा , परभणी , नांदेड , चंद्रपूर , भंडारा , गडचिरोलीचा समावेश आहे.


कोरोनाचे १५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून त्यापेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे . तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे . रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची दाट शक्यता आहे . तर ऑरेंज झोनमधल्या जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील . तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल . वाहतुकीत सवलत देण्यात येईल . याशिवाय ५९ पेक्षा कमी कर्मचारी वर्ग असलेली कार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे . तर ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळेल . इथले निर्बंध टप्प्याटप्यानं हटवले जातील आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल .
***