भारतात अनेक राज्यांत कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव झालेला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या संसर्गाविरोधात तिथल्या प्रशासनाने कोरोनाशी लढण्यासाठी युद्ध पातळीवर आणि ज्या तातडीने उपाय योजले आहेत, ते कौतुकास्पद आणि चांगले परीणाम दाखवणारे आहेत. राजस्थानचा, आणि विशेषत : तेथल्या भिलवाडा जिल्ह्यातल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा आदर्श भारतातील सगळ्या राज्यांनी ठेवण्याची किंवा असे म्हणू या की पूर्ण देशांत हा पॅटर्न राबवण्याची गरज निर्माण झालेली आहे.
भारतात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक राजस्थान जिल्ह्यात झालेला आहे. अशा वेळी तिथे राबवण्यात आलेला ' भिलवाडा पॅटर्न ' जर भारतात राबवला तर भारतातून लवकरच कोरोनाला हद्दपार करता येईल असं वाटतंय .
भिलवाडा पॅटर्न काय आहे? आणि तो कशा प्रकारे राबवला जातोय?
राजस्थानचे दहा जिल्हे कोरोना प्रभावित आहेत. तिथल्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी ५ शहरांमध्ये करफू लावण्यात आला आहे. मात्र यात एक चांगली बातमी अशीही आहे, की जयपुर येथील एसएमएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिथल्या ५ कोरोनाबाधित रुग्णांना केवळ दहा दिवसांत बरं करून घरीही पाठवलं आहे . या रुग्णांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध देण्यात आलं होतं . या हॉस्पिटलचे डॉ. भंडारी म्हणतात, की कोरोनाला घाबरू नका. शंका येताच वेळेवर आपली तपासणी करून घ्या आणि योग्य उपचारांनी या आजारातून बरे व्हा.
राजस्थानमधील सॅनिटायझरची कमतरता पूर्ण करण्यासाठी राज्यातील पाच साखर कारखाने आणि काही मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सॅनिटायझर बनवण्यासाठी कामाला लावण्यात आलेलं आहे. राजस्थानमध्ये मागच्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ वर पोचली होती. राजस्थानच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव रोहीत सिंग यांच्या सांगण्याप्रमाणे राजस्थानमध्ये या संसर्गाशी लढण्यासाठी सर्व स्तरांवर युद्ध पातळीवर सुरूवात केली गेली होती.
भिलवाडा जिल्ह्यात सर्वाधिक बाधित संख्या
१९ मार्चला राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात कोरोनाचे ६ बाधित रूग्ण सापडल्यावर तिथले प्रशासन जागे झाले आणि त्यांनी या परिस्थितीला कसे हाताळावे यावर गंभीरपणे विचार सुरू केला. या सहा रुग्णांत तिथल्या एका खाजगी हॉस्पिटलमधले तीन डॉक्टर आणि तीन वैद्यकीय कर्मचारीच होते. आता राजस्थानमधील निम्मे कोरोनाबाधित भिलवाडा जिल्ह्यातलेच आहेत.
तिथल्या प्रत्येक मेडीकल कॉलेजमध्ये कोरोनाची चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जनतेच्या सहकार्याने कोरोनाला हरवण्याचा निश्चय तिथल्या प्रशासनाने केला आहे . राजस्थानचे पाहून आग्रा येथे देखील हा 'भिलवाडा पॅटर्न ' राबवण्यात आला.'
भिलवाडा पॅटर्न' मध्ये अंमलात आणलेल्या महत्त्वाच्या गोष्टी
जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. यातून केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या. बाकी कोणीही बाहेरून आत येणार नाही आणि आतून बाहेर जाणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली. पाच मोठी हॉस्पिटल्स अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून राखीव ठेवण्यात आली. भिलवाडा आणि त्याजवळच्या परीसरात अधिकाधिक लोकांची टेस्ट करण्यात आली. यात नऊ दिवसांत २४ लाख लोकांची तपासणी झाली. देशातली आजवरची कोरोनाची ही सर्वात मोठी तपासणी आहे. तपासणीत निरोगी निघालेल्या लोकांना सॅनिटायझरने फवारणी करून घेण्यात आले.
कोरोना बाधित रुग्ण जर दगावलाच तर त्या हॉस्पिटलला, त्याच्या घराला, आणि आजुबाजूच्या परिसराला देखील जंतुनाशक फवारणीने स्वच्छ करण्यात आले. संशयित कोरोना - बाधितांना थ्री - स्टार हॉटेल्समध्ये विलगीकरण अवस्थेत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. ६५५४ लोकांना आपापल्या घरीच विलगीकरण अवस्थेत राहण्यास बजावून एका ऍपद्वारे त्यांच्या स्थितीची रोजच्या रोज पडताळणी करण्यात येते. या लोकांना रोज दुपारी बारा वाजेपर्यंत आपली स्थिती कशी आहे? त्यात काय बदल आढळताहेत ते ऍपवर अपडेट करण्यास सांगितलेले आहे. या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती परवानगीशिवाय घराबाहेर पडली तर त्याची माहिती लगेच नियंत्रण कक्षाला कळेल अशी त्या ऍपमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
गरज लागलीच तर १३१०० बेडची आगाऊ तयारी करून ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेतच खरेदी करायची असा नियम केलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. काही माध्यमांचं असा होरा आहे, की भिलवाडा पॅटर्नचे यश पाहता हा पॅटर्न आता आणि लॉकडाऊन उठल्यावरही संपूर्ण देशात राबवला जाईल, किंवा जायला हवा.
***