पुणे पोलिस झाले कडक : लाॅकडाऊन पास रद्द


संपूर्ण पुणे शहर सील करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी आता त्यादृष्टीने पावले टाकली आहेत...


पुणे : काल दुपारी दोन वाजल्यापासून पुण्यात कडक संचारबंदीची अमंलबजावणी करण्यात आली आहे. दुपारी दोननंतर पुढील सात दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना दिलेले पास पोलिसांनी रद्द केले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.


अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या दुकानांच्या वेळादेखील कमी करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर कमीत कमी लोक आले पाहिजेत यासाठी इतरांना दिलेले पासदेखील रद्द करण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरात पुणे पोलिसांनी सुमारे दीड लोख लोकांना शहरांतर्गत पास दिले आहेत. यातील अत्यावश्‍यक सेवांसाठी जाणाऱ्या लोकांचे ग्राह्य धरण्यात येणार असून इतरांना दिलेले पास रद्द करण्यात आल्याचे आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.


कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, तरीही अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त या ना त्या कारणाने पुणेकर रस्त्यावर येतच आहेत. त्याला आवर घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्याच्या काळात शहरातील कोरोना संसर्गाचे रूग्ण कमी होण्याेवजी त्यात दिवसोंदिवस वाढच होत असल्याने प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.आजही शहरात मोठ्या प्रमाणात नागरीक मास्क न लावता वाहनावरून फिरताना दिसत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.


पोलिसांकडून सोमवारी रात्री बारा वाजताच संपूर्ण शहर सील करण्यात आले आहे. जागोजागी रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरात घराजवळचा परिसर वगळता शहरात इतरत्र जाता येणार नाही, अशा पद्धतीने पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. या पाश्‍र्वभूमीवर दुपारी दोन वाजल्यापासून संचारबंदीची आणखी कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
 ***