नवी दिल्ली 29 एप्रिल: लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लाखो कामगार आणि मजुरांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये मजुर आणि कामगरांना जाता येणार आहे. या कामगारांना घेऊन जाण्याची व्यवस्था त्या त्या राज्यांनी करायची आहे. याबाबत गृहमंत्रालयाने आज एक आदेश काढला आहे. त्यामुळे देशभरात अडकून पडलेले पर्यटक, विद्यार्थी, मजूर आणि कामगारांना आपापल्या घरी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय.
निघतांना या मजुरांची मोडिकल चाचणी व्हावी आणि त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळली नाहीत तर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. हे लोक त्या गावी गेल्यानंतर त्यांची तिथेही टेस्ट होणार असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
या लोकांना ज्या बसमधून येण्यात येणार आहे त्या बसेस सॅनिटाइज करण्यात याव्यात असंही गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ठाकरे सरकारने दुसरा लॉकडाऊन लागू केला त्याला दोन आठवडे उलटून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करत 3 मेपर्यंत ताळेबंदी वाढवली. आता काही राज्यांनी आपापल्या क्षेत्रांत टाळेबंदी वाढवण्यासंदर्भात सुरुवात केली आहे. पंजाबने सर्वप्रथम आणखी 15 दिवस टाळेबंदी वाढणार असल्याची घोषणा केली आता Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे.
दोनच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाळेबंदी वाढवण्यासंदर्भाच्या निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे लक्ष आहे. राज्यात कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे. आज राज्याची संख्या 10 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या दोन शहरांमधला आणि जिल्ह्यांमधला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
***