पगार कपात अथवा नोकरीत अडचण आली तर थेट साधा संपर्क,कामगारांसाठी PM मोदींचे विशेष पाऊल...


नवी दिल्ली दि17: कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. तर अनेक कामगारांना अर्ध्या वेतनावर समाधान मानावे लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून नोकरदार वर्गाची काळजी घेण्यात आली आहे. नोकरी संदर्भात काही तक्रार असेल तर ती नोंदवण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून 20 कॉल सेंटर बनवले आहेत.


केंद्रीय कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी संस्थेबरोबरच (EPFO) राज्य कर्मचारी विमा निगम (ESIC)कडून संगठित क्षेत्राचं झालेलं नुकसान आणि पगारात केलेली कपात याबाबत अहवाल मागवला आहे. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.


तसेच पगार आणि नोकरी कपातीसंदर्भातील माहिती रोज गोळा करण्यात येणार आहे. तर पीएमओकडे ही माहिती आठवड्यातून एकदा देण्यात येणार आहे. तर साधारणत: सर्व कंपन्यांचे पगार महिन्याच्या 7 ते 10 तारखेपर्यंत होतात. यामध्ये जर उशीर झाला तर त्याचा अहवाल सुद्धा सरकारला देण्यात येणार आहे.


नोकरी गमावण्यासंदर्भात, पगार कपाती संदर्भात किंवा उशिरा पगार होत असल्यास तक्रार करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून 20 कॉल सेंटर बनवले आहेत. कामगार मंत्रालयाने सेंट्रल चीफ लेबर कमिशनर अंतर्गत हे कॉल सेंटर बनवले आहेत. या कॉल सेंटरमधून मिळालेली माहिती देखील सरकारला देण्यात येणाऱ्या अहवालात सामाविष्ट करण्यात येणार आहे.


दरम्यान कोरोनामुळे देशातील अनेक उद्योगधंदे हे बंद आहेत. अनेक नोकरदार हे सध्या अनिश्चित काळासाठी सुट्टीवर आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला पगार मिळणार की नाही. याबाबत काहीसा संभ्रम आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देशातील उद्योजकांना आवाहन केले आहे की, कोणालाही नोकरीवरून काढू नका अथवा कामगारांचे पगार कमी करू नका.
***