बारावीची पुस्तके ऑनलाइन


तेजस्वी लेखणी प्रतिनिधी : मुंबई करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बारावीच्या पुस्तकांनाही बसला आहे. यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, लवकर पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी बालभारतीने विशेष प्रयत्न केले. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत तयार पुस्तके वितरित होऊ शकत नसल्यामुळे ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही पुस्तके विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार असून, विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करू शकतील.
       
       राज्य मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२०-२१) बदलणार आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. यंदाही बालभारतीने मार्चअखेरीस बारावीची सर्व पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले. मात्र, लॉकडाऊन न उठल्यास विद्यार्थ्यांना दुकानांमध्ये ती पुस्तके पोहोचणे व पर्यायाने विद्यार्थ्यांना ती मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता बारावीची पुस्तके बालभारतीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. पहिली ते अकरावीचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने गेल्या वर्षीपर्यंत बदलण्यात आला. या अभ्यासक्रमाची पुस्तके वेबसाइटवर पूर्वीपासूनच ऑनलाइन उपलब्ध आहेत. संचारबंदीमुळे पुस्तकांचे वितरण करणे बालभारतीला शक्य नसल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या अभ्यासक्रमाचे साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभ्यासक्रमाची पुस्तके वेबसाइटवर डाऊनलोड करण्यासाठी देण्यात आली आहे. तसेच रेडिओ, दूरचित्रवाणीच्या माध्यमातूनही अभ्यास साहित्य देण्याबाबतची पडताळणी करण्यात येत आहे.


***