SBIच्या ग्राहकांसाठी अलर्ट: बँकेने केले सावध!


मुंबई: करोना व्हायरसच्या धोक्यामुळे सर्व लोक घरात थांबले आहेत. पण सायबर गुन्हेगारी आणि फसवणूक काही थांबलेली नाही. अनेक सायबर गुन्हेगार सर्व सामान्यांच्या कमाईवर हात साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. SBI ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यातून त्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्यास सांगितले आहे.


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि इंटरनेटवरून SBIच्या ग्राहकांना एक मेसेज पाठवला जात आहे. या मेसेजमध्ये ग्राहकांना पासवर्ड आणि खात्याची माहिती अपडेट करण्यास सांगितले जात आहे.


संबंधित लिंक ओपन केल्यास इंटरनेट बँकिंगचे पेज ओपन होते. हे पेज SBIच्या अधिकृत पेज सारखे वाटते आणि ग्राहक त्यावर लॉगइन करून माहिती देतात. याचा फायदा घेत फसवणूक करणारे ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतात.


SBIने ग्राहकांना आवाहन केले आहे की जर अशा प्रकारचा मेसजे अथवा ई-मेल मिळाला असेल तर तो तातडीने डिलीट करा. अशा प्रकारे आलेली लिंक ओपन करू नये आणि खात्याची तसेच पासवर्ड संदर्भातील गोपनिय माहिती देऊ नये.


यासंदर्भात काही तक्रार अथवा माहिती बँकेला कळवायची असेल तर epg.cms@sbi.co.in आणि phishing@sbi.co.in या दोन ई-मेल आयडीवर कळवण्यास सांगितले आहे. तसेच सायबर क्राईम विभागाकडे तक्रार देण्यास सांगितले.


SBIच्या नावावर काही जण http://www.onlinesbi.digital ही बनावट आणि खोटी वेबसाइट चालवत आहेत. बँकेने अशा प्रकारच्या लिंकपासून सावध राहण्यास सांगितले आहे. याआधी बँकेने ईएमआय टाळण्यासंदर्भात आलेल्या मेसेजवर ग्राहकांना सावध केले होते.
***