राज्यात दारू विक्रीला परवानगी नाहीच; टोपेंचं घुमजाव


सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असेल तर दारू विक्रीची दुकानं पुन्हा सुरू करण्यात येतील, असं विधान करून अडचणीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लगेचच घुमजाव केलं आहे. राज्यात दारू विक्रीला कोणतीही परवानगी देण्याचा सरकारचा विचार नाही, अशी सारवासारव टोपे यांनी केली आहे.


मुंबई: सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असेल तर दारू विक्रीची दुकानं पुन्हा सुरू करण्यात येतील, असं विधान करून अडचणीत सापडल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लगेचच घुमजाव केलं आहे. राज्यात दारू विक्रीला कोणतीही परवानगी देण्याचा सरकारचा विचार नाही, अशी सारवासारव टोपे यांनी केली आहे.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल संध्याकाळी फेसबुक लाइव्हवरून राज्यातील जनतेशी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वामंध्ये दारू विक्रीवर कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, राज्य सरकारने दारू विक्रीबाबतच्या भूमिकेवर कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा दारू विक्री सुरू करण्यात येणार आहे का? असा सवाल एका पत्रकाराने त्यांना यावेळी विचारला. त्यावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असेल तर राज्यात पुन्हा दारू विक्री सुरू केली जाऊ शकते, असं टोपे यांनी सांगितलं.


फेसबुक लाइव्हनंतर टोपे यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच ट्विट करून त्यावर स्पष्टीकरण दिलं. लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी सारवासारव टोपे यांनी केली आहे.


***