मुंबई : देशात कोवीड-१९ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घरभाडे वसुली किमान तीन महिने भाडेकरूंना वेळ द्यावा, अशा सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत राणे म्हणतात, ‘सरकारने तीन महिन्यांचे घरभाडे पुढे ढकलले; पण तीन महिन्यांनंतर तीन महिन्यांचे पैसे माणसाने आणायचे कुठून ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणतात की, ‘तीन महिन्यांचे घरभाडे नुसते पुढे ढकलून चालणार नाही तर घरभाडे राज्य सरकारने स्वतः भरावे किंवा माफ करावे, अशी मागणी निलेश राणी यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यवसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.
***