भारतात हे प्रमाण किती आहे ते एका अहवालातून समोर आलं आहे
आपल्या देशासह संपूर्ण जगातले आरोग्य कर्मचारी हे एका महाभयंकर रोगाशी लढत आहेत. ज्याचं नाव आहे करोना व्हायरस. आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी सध्या मोलाचं सहकार्य करत आहेत. ज्यांना आपण सिस्टर्स म्हणतो त्या नर्सेसची भूमिका या सगळ्या सेवेत महत्त्वाची असते. या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत WHO, ICN यांनी एक अहवाल समोर आणला आहे.
जागतिक स्तरावर प्रति १० हजार लोकांमध्ये साधारण ३६.९ नर्सेस आहेत. मात्र यामध्ये विभागवार भिन्नता आहे. अमेरिकेचं उदाहरण घेतल्यास यामध्ये प्रति १० हजार लोकांमध्ये ८३.४ एवढं नर्सेसचं प्रमाण आहे. तर अफ्रिका भागात प्रति १० हजार माणसांमध्ये ८.७ नर्सेस आहेत. या अहवालावरुन हे समोर आलं आहे की २०३० पर्यंत जगभरात ५७ लाख नर्सेसची कमतरता भासू शकते.
भारतात काय आहे स्थिती?
भारतात नर्सेसचं प्रमाण कमी आहे. २१०८ पर्यंतची आकडेवारी सांगते की १३० कोटींच्या देशात नर्सेसची संख्या १५.६ लाख आहे. तर ७ लाख ७२ हजार नर्सिंग सहयोगी कर्मचारी आहेत. ४७ टक्के मेडिकल स्टाफ, २३.३ टक्के डॉक्टर, तर अवघे ५.५ टक्के डेन्टिस्ट आहेत. नर्सेसना मिळणारं कमी वेतन ही देखील भारतातील मोठी समस्या आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीतल्या बत्रा रुग्णालयातील नर्सेस आणि आरोग्य संस्थेत काम करणाऱ्या नर्सेस या संपावर गेल्या होत्या. कामाच्या नेमून दिलेल्या तासांपेक्षा आमच्याकडून जास्त काम करुन घेण्यात आलं, त्यासाठी आम्हाला सक्ती करण्यात आली असा आरोप या सगळ्यांनी केला होता. तसेच आम्हाला या जास्तीच्या कामाचा योग्य मोबदलाही दिला गेला नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. भारतातल्या नर्सिंग क्षेत्रात ८८ टक्के महिला आहेत. असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
सध्या करोनाचा सामना सगळं जग करतं आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीही या सगळ्यांना सलाम केला आहे. देश एका संकटाला सामोरा जात असताना डॉक्टर, नर्सेस यांचं प्रमाण मात्र घटल्याचं दिसतं आहे.
***