नोकरीच्या नावे फसवणूक 'अशी' ओळखा आणि सतर्क राहा


जो-तो नोकरीच्या शोधात असतो. बेरोजगार असेल तर त्यालाही नोकरी हवी असते आणि जे नोकरी करत असतात, त्यांनाही अधिक चांगल्या पगाराची, हुद्द्याची नोकरी हवी असते. अनेकदा केवळ पगारासाठी नाही तर इतर सुविधांसाठी देखील लोक नोकरी बदलत असतात. पण नवी नोकरी शोधताना अनेकदा लोकांची फसवणूक होते. आजकाल तर नोकरीच्या नावाने फसवणुकीचे प्रकार खूपच वाढले आहेत. तरुणांना नोकरी आणि मोठ्या पगाराचं आमिष दाखवून ठगवलं जातं. त्यानंतर त्यांच्या बँक अकाउंटचे डिटेल्स किंवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डचे डिटेल्स मागितले जातात. डिटेल्स मिळताच फसवणूक करणारे लोक अकाउंट साफ करून टाकतात किंवा मग क्रेडिट वा डेबिट कार्ड वापरून पैसे पळवतात. पण आपण थोडीशी सावधगिरी बाळगली तरी या चोरांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत पाच असे प्रकार ज्यामुळे तुम्हाला मिळालेली नोकरीची ऑफर खरी आहे की खोटी हे समजू शकेल...



  • पैसे मागणे


एक गोष्ट नीट ध्यानात असू द्या की कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी पैसे मागितले जात नाहीत. विश्वासार्ह जॉब पोर्टल देखील पैसे मागत नाहीत. पण फसवणूक करणारे लोक पैसे मागतात. बहुतांश लोकांचं म्हणणं असतं की तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर पैसे रिफंड केले जातील. पण असं होत नाही. एकदा का तुम्ही पैसे दिले की समजा तुम्हाला ते पुन्हा कधीच संपर्क साधणार नाहीत आणि तुम्हीही कधी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.




  • क्रेडिट कार्ड / आधार / पॅन आदींचे डिटेल्स मागणे



फसवणूक करणारे तुमची गोपनीय माहिती मागतील. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्ड क्रमांक, एक्सपायरी डेट, सीवीवी नंबर किंवा मग आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांक. अशा वेळी हे लक्षात असूद्या की नोकरीसाठी कोणालाही तुमचे क्रेडीट कार्डाचे तपशील देण्याची गरज नाही. आधार कार्ड आणि पॅन कार्डचे डिटेल्स तुमचा एखाद्या कंपनीत चाचणी आणि मुलाखत होऊन निवड झाल्यानंतर च मागितले जातात. निवड झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर देण्यापूर्वी हे तपशील मागितले जातात. पण कुणा त्रयस्थ व्यक्तीला या तपशीलांची बिल्कुल आवश्यकता नसते. तेव्हा ध्यानात ठेवा, तुमच्या रिक्रुटरशिवाय अन्य कोणीही डिटेल्स मागितले तर बिल्कुल देऊ नका.



  • सोपी निवड पद्धती


कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी एक ठराविक प्रक्रिया असते. बहुतांश ठिकाणी चाचणी आणि मुलाखत (इंटरव्ह्यू) होतो. त्यानंतर जॉब ऑफर केला जातो, आणि खोट्या नोकरीचं आमिष दाखवणारे तुम्हाला थेट जॉइनिंग असल्याचं सांगतात. पण प्रत्यक्षात असं होत नाही. थेट जॉइनिंगची ऑफर कोणी दिली, तर तुम्ही सावध व्हायला हवं.



  • अपेक्षेपेक्षा जास्त पगार


कोणत्याही ठिकाणी सॅलरीच्या नावावर पैशांचा पाऊस पाडला जात नाही, हे तुम्ही तुमच्या डोक्यात एकदम फिक्स करून ठेवा. प्रत्येक जॉब आणि रोल्सच्या दृष्टीने पगार जवळपास निश्चित असतो. जर तुम्ही फ्रेशर असाल तर कॉर्पोरेट जॉबमध्ये तुम्हाला २ ते ४ लाख रुपयांपर्यंतची ऑफर असू शकते.




  • प्रसिद्ध जॉब पोर्टलच्या नावाने गंडा


ऑनलाइन गंडा घालणारे खूप स्मार्ट असतात. ते बनावट पोर्टल्सचा वापर करतात. पण हे पोर्टल्स दिसताना आधीच उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह पोर्टलसारखेच दिसतात. जसे job-offer@naukrioutlook.com आणि jobs@naukrioutlook.com. म्हणून जर जॉब ऑफर आली तर आधी पोर्टलकडे बारकाईने लक्ष द्या.


***