देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली आहे. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. भाजपा नेते विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढादेखील यावेळी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे पत्र सोपवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे”.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात काही प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. "एखादं वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत," असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची अशा पद्धतीने चौकशी करण्याचं धाडस सरकार दाखवू शकलेलं नाही”. “सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितलं असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा," अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
***