मुंबई दि.१९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहात ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. राज्यभरात असलेल्या तुरूंगातील कैद्याच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं पाच तुरूंगात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील तुरूंगामध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारनं औरंगाबाद येथील तुरूंगात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात पोलिसांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था तुरूंगातच करण्यात येणार आहे,’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
तसेच तुरूंगामध्ये करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहेत. औरंगाबादमधील तुरूंगाबरोबरच लवकरच राज्यातील इतर पाच तुरूंगांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असंही देशमुख म्हणाले. लॉकडाउनच्या काळात कुणालाही तुरूंगात प्रवेश करण्यास वा तुरूंगातून बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आल्यानंतर राज्य सरकारनं कैद्यांची संख्या जास्त असलेल्या तुरूंगांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे.
***