'या कठिण काळात आपल्या मित्रांच्या मदतीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व भारत करायला तयार आहे
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा पुरवठा केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी आज टि्वट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दोन्ही देशांच्या प्रमुखांना टि्वटरवरुन प्रतिसाद देत मैत्री पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाल्याचे सांगितले.
बेंजामिन नेतान्याहू यांना पाठवलेल्या संदेशात मोदी म्हणतात…
“आपल्याला एकत्र मिळून करोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करायचा आहे. या कठिण काळात आपल्या मित्रांच्या मदतीसाठी जे काही शक्य आहे, ते सर्व भारत करायला तयार आहे. इस्रायली जनता आनंदी राहो, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो” असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
बेंजामिन नेतान्याहू यांनी संपूर्ण इस्रायलच्यावतीने मोदींचे आभार मानले.
जायर बोलसोनारो यांना पाठवलेल्या संदेशात मोदी म्हणतात…
“जायर बोलसोनारो मी तुमचा आभारी आहे. या कठिण भारत आणि ब्राझीलची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाली आहे. करोना व्हायरसविरोधी या लढाईत मानवतेच्या दृष्टीकोनातून आपले योगदान देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे” असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
भारताने इस्रायलला पाच टन औषधांची निर्यात केली आहे. यामध्ये मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचाही समावेश आहे. या गोळ्या करोनावरील उपचारासाठी फायद्याचे असल्याचे बोलले जात आहे. भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधे पाठवल्यानेच नेतान्याहू यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
नेतान्याहू यांनी गुरुवारी एक ट्विट करुन मोदींचे आभार मानले. यामध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख प्रिय मित्र असा केला आहे. “क्लोरोक्विन इस्रायलमध्ये पाठवल्याबद्दल मी माझे प्रिय मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. इस्रायलच्या सर्व नागरिकांतर्फे धन्यवाद,” असं नेतान्याहू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
***