महात्मा बसवेश्वर यांचा विषमतेविरुद्ध विद्रोह ...!!!


 बाराव्या शतकात भारताचे समाजजीवन हे अंध:कारमय झाले होते. अनेक रूढी, अंधश्रद्धा यांनी समाजपुरुष त्रस्त झालेला होता. बहुदेवता उपासना, कर्मकांड, अंधश्रद्धा, पुरोहित वर्गाची मतांधता, पाप-पुण्याची दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, विषमता, कामकरी-कष्टकरी वर्गाची पिळवणूक, स्त्री दास्यत्व इत्यादींनी भारतीय समाजमन बेजार झाले होते, क्षतिग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत भारतीय समाजपुरुषाला उभे करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी करून दाखवले होते. त्यासाठी त्यांना तत्कालीन समाजसत्तेशी, राजसत्तेशी प्रचंड संघर्ष करावा लागला. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन ...!!!


महात्मा बसवेश्वर यांनी शोषणाविरुद्ध ,  लोकांना दारिद्रयात ठेवण्याविरुद्ध ,  कर्मकांड-अंधश्रद्धाद्वारे धार्मिक दहशतीत ठेवण्याविरुद्ध , स्त्रीला भोगवस्तू समजून तिच्यावर मालकी गाजवण्याविरुद्ध ,  मूठभर लोकांच्या हाती सत्ता आणि संपत्ती प्रस्थापित करण्याविरुद्ध  ठामपणे कार्य केले   . जीवाची दमछाक करणा-या या षडयंत्रद्वारे समाजाच्या मोठया वर्गाला धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीत बंदिस्त करण्यात आले होते. या अनिष्ठतेवर कडाडून प्रहार करण्याची हिंमत महात्मा बसवेश्वरांनी दाखवली . म्हणूनच महात्मा बसवेश्वर हे विद्रोही आहेत.


 महात्मा बसवेश्वरांना परिवर्तन हे व्यक्तीच्या अंत:करणांतून घडवून आणायचे होते. त्यासाठी एक नवी जीवन पद्धती त्यांनी दिली. जेथे शोषण नाही, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ असा कुठलाही भेदाभेद नाही, कुठल्याही प्रकारची विषमता नाही, जाती-जमाती भेद नाही, कर्मकांड नाही, अशा प्रकारची जीवन पद्धत महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून अस्तित्वात आणून दाखवली. म्हणूनच महात्मा बसवेश्वरांना दक्षिणेतील बुद्ध म्हणून आदराने गौरवण्यात येते.


साम्राज्य जरी चालुक्यवंशीय सम्राट बिज्जलाचे असले तरी लोकांच्या हृदयांवर साम्राज्य महात्मा बसवेश्वरांचेच होते. ख-या अर्थाने ते तत्कालीन समाजाचे हृदयसम्राट होते. वर्णव्यवस्थेला त्यांनी प्रखर विरोध केला .महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून, जी ‘वचन’ रूपाने अवरतलीत, एका नव्या धर्मक्रांतीला जन्म दिला. धर्म हा जीवनात उतरला पाहिजे. धर्म म्हणजे जगण्याची आणि आचरण करण्याची पद्धत. आचारणाला महात्मा बसवेश्वर प्राधान्य देत. ‘चाले तैसा बोले’ याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते .


महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर ते त्यांनी सडकून टीका केली. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सारे समान आहेत. संधी मिळाली तर सर्वानाच उच्च होता येते, हे बाराव्या शतकात प्रतिपादन करणारे महात्मा बसवेश्वर महान द्रष्टे होते. स्वतंत्र भारतात आरक्षणाची संधी मिळाल्यामुळे उपेक्षित दुर्लक्षित समाज सक्षम बनलेला आपण बघत आहोत. यावरून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे द्रष्टेपण लक्षात येते. वर्ण व्यवस्थेवर प्रहार करतांना रुढीवाद्यांना बसवेश्वर यांनी अनेक प्रश्न  विचारले .


बसवेश्वरांना जातीपातीत बंदिस्त झालेला समाज दिसत होता. त्यावर प्रहार करताना ते म्हणतात ,  ‘हत्या करणारा नीच म्हणावा, कुजके मांस खाणारा कनिष्ट जातींचा म्हणावा, इथे जातीपातींचा संबंध येतोच कुठे?
कुडल संगमेश्वराला शरण गेलेला सर्व जीवसृष्टीवर प्रेम करतो तोच उत्तम जन्माचा म्हणावा.’


जातीपातीत बंदिस्त अशा समाजव्यवस्थेवर आघात करताना ते प्रतिपादन करतात की, जन्मावरून व व्यवसायावरून स्पृश्यता, अस्पृश्यता मानू नये. कुळ, जातीमुळे श्रेष्ठता कमी होत नाही, असे बसवेश्वर आपल्या वचनातून प्रतिपादन करतात. महात्मा बसवेश्वरांना अस्पृश्यांविषयी अपार प्रेम होते. ते अस्पृश्यांना आदराने ‘माहेश्वर’ म्हणून संबोधत.


बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र समजले जात असे. तिला मोक्ष नाही, असा समज होता. यावर बसवेश्वरांनी विडंबन केले. स्त्रीवर अन्याय होता, हे ओळखून त्यांनी स्त्रीला शिक्षित केले, चालते-बोलते केले. मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. आध्यात्मिक उपासनेची परवानगी दिली. बसवेश्वरांच्या कार्यामुळे प्रेरित होऊन नंतर अक्क दहादेवी, राणी महादेवी, मुक्तायका, नागलंबिका आदी अनेक स्त्री संत नावारूपाला आल्या. अबला ही सबला होऊ शकते, हे बसवेश्वरांनी जगाला दाखवून दिले. तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह त्यांच्या पुढाकाराने घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला.


आजच्या समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार मार्कस-एंगल्स यांच्या कित्येक शतके आधी केला. श्रम सिद्धांताला केवळ आर्थिक बैठक देऊन ते थांबले नाहीत, तर श्रम सिद्धांताला त्यांनी आध्यात्मिक बैठकीची जोड दिली. कोणतेही काम लहान-मोठे नाही. मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. महात्मा बसवेश्वरांच्या कृतिशील वैचारिक चळवळीचा प्रभाव तत्कालीन समाजव्यवस्थेवर पडला आणि जातीपातींच्या भिंती गाडून लाखोंच्या जनसमूहाने ‘लिंगायत’ धर्मात प्रवेश केला. 


 आज तो अध्यात्माबद्दल बोलतो. पैसे देऊन लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांची पोपटासारखी वटवट ऐकायला जातात. जो जास्त पैसा देतो आणि घेतो तो तेवढाच श्रेष्ठ व आध्यात्मिक समजला जातो. जात कायम ठेवून सोशल इंजिनीअरिंगच्या गोष्टी सुरू आहेत. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला ‘लिंगायत’ ही ओळख दिली होती. आपल्या वचन साहित्याद्वारे त्यांनी मानवमात्रांसाठी , विश्वकल्याणासाठी सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली होती. समतेचा स्फुल्लिंग सामान्य माणसाच्या अंत:करणात चेतवला होता. म्हणूनच ख-या अर्थानी  बसवेश्वर हे  रुढी, अंधश्रद्धा , अस्पृश्यता, विषमता , शोषण , गुलामगिरीविरुद्ध पेटून उठणारे विद्रोही ठरतात.  महात्मा बसवेश्वर यांना पुन्हा एकदा  त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन ...!!! 


                        -  यशवन्त भंडारे,
                  माहिती संचालक, औरंगाबाद.
                            *****