कोरोना... आणि मुस्लिम समाज!


कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा सर्वात जास्त मुस्लिम समाजातून आहे, ही गोष्ट आधी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना ओ.पी.डी. मध्ये आजकाल एक नेहमीचं चित्र असं दिसतं... ओ.पी. डी. मध्ये एखादा पस्तीशीतील तरुण येतो, सोबत एक बुरखाधारी स्त्री आणि तिसरी चौथीतील एक-दोन मुले असा परिवार. 
तो म्हणतो, ' सबकी करोना की टेस्ट करनी है'. 
डॉक्टर विचारतो, 'कही बाहरीदेश गये थे?'
उत्तर -'नही'
'आसपास किसी को कोरोना हुवा है?'
उत्तर -'हां... हमारी अम्मी पॉझिटिव्ह आयी है' 
पुढील परिस्थितीच्या अंदाजाने त्या लहान मुलांकडे पाहून मनात चर्रर्र होते.
          गेल्या काही महिन्यांपासून जगभरात एक शब्द क्षणोक्षणी बदनाम होतोय... तो म्हणजे 'कोरोना'! जगभरात हे घडत असताना भारतात मात्र या कोरोनाला जोडूनच आणखी एक शब्द बदनाम होत गेला... 'मुस्लिम समाज'! ज्याच्याकडे एक वेगाने संक्रमण करणारा आणि जीवाला धोका निर्माण करू शकणारा आजार केवळ याच दृष्टिकोनातून पाहिले जात असताना भारत हा एकमेव देश आहे जिथे या आजारासोबत एक धर्म जोडला गेला!
          एक डॉक्टर म्हणून काम करत असताना एखाद्या समाजाविषयी बोलणे किंवा त्याचा उल्लेखही करणे याला, डिग्री हाती घेताना घेतलेली शपथ आणि स्वत:चे मन दोन्ही मान्यता देत नाहीत. असे असले तरी आज हे बोलणे आवश्यक आहे... खरंतर मुस्लिम समाजातील एखाद्या सुशिक्षित, समजूतदार, तरूण पिढीतील कोणीतरी हे मांडले असते तर त्याचा जास्त परिणाम झाला असता.
          भारतात कोरोना हा आजार आला तो विमानमार्गाने. तिथेच त्याला अटकाव घालण्यास आपले सरकार अपयशी ठरले. त्या आलेल्या अपयशाचे खापर फोडायला  'मरकज' नावाचे डोके मिळाले... किंबहुना 'जमात' ने स्वत:हून हे अपयश आपल्या माथी फोडून घेतले. कोरोना मुस्लिम समाजाला चिकटला तो इथेच! परदेशातून आलेल्या लोकांना झालेला आजार बरा झाला, काहींचा मृत्यूही झाला. मरकजहून परतलेले लोकही निगेटिव्ह आले, काही मृत पावले... ही दोन्ही प्रकरणे आता बाजूला पडली आहेत. दरम्यानच्या काळात नावाला चिकटलेला कोरोना बाजूला करण्यासाठी मुस्लिम समाजाने काही प्रयत्न केले का...? तर त्याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल! इतर समाजांच्या मानाने मुस्लिम समाज कोरोनाबद्दल कधी गंभीर दिसलाच नाही. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना औरंगाबादमध्ये सामुहिक नमाजपठणासाठी आव्हान केले जाणे, तसेच त्याला विरोध करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला होणे हे कशाचे लक्षण आहे? मालेगाव, पुणे येथील पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनाही याला अपवाद नाहीत. टिकटॉकवर मनोरंजनाच्या नावाखाली आपल्याच समाजाची दिशाभूल करणारे विडीओ टाकणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य न करणे, शासनाचे नियम न पाळणे... असे करणारे बोटावर मोजता येतील इतकेच लोक असतील पण या चार लोकांमुळे अख्खा समाज बदनाम होतोय. खरंतर अख्ख्या समाजाचं 'शांत बसणं' ही या छटाकभर लोकांना गुन्हा करण्यासाठी मिळालेली मुक संमतीच समजली जाते! आपल्या देशात मुस्लिम समाजाला चिमटीत पकडण्याची, त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडली जात नाही. अशावेळी मुद्दामहून अशी संधी निर्माण केली जाणे हा विचीत्रपणाच म्हणता येईल! 
           नांदेडमध्ये अडकलेल्या तीन हजार शीख लोकांना घरी नेण्यासाठी पंजाबमधून ८० बस आल्या पण त्याबद्दल कोणी शब्दही काढला नाही. या देशात बहुसंख्य हिंदू व्यतिरिक्त ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन... कितीतरी समाजाचे, धर्माचे लोक आहेत तेही कोटींच्या संख्येने. भारतभर कोरोनाच्या संक्रमणासाठी हे सर्वच कारणीभूत असताना फक्त मुस्लिम समाजाचेच नाव पुढे आले. त्याचे कारण समजून घेण्यासाठी स्वत: मुस्लिम समाजातील किमान सुशिक्षीत लोकांनीतरी एकदा आपल्याच मोहल्ल्यात डोकावून पाहणे गरजेचे आहे. नागपूरातील सतरंजीपुरा, औरंगाबादेतील उस्मानपुरा- बीबी का मकबरा हे परिसर, पुण्यातील भवानी पेठ, नांदेडमधील पीरबुऱ्हान परिसर, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, पिंपरी चिंचवड मधील रूपीनगर, खराळवाडी, अहमदनगरमधील मुस्लिम बहुल भाग, अकोल्यातील बैदपुरा, मोमीनपुरा, संगमनेरातील नाईकवाडापुरा... त्याच त्या मोहल्ल्यातून पुन्हा पुन्हा पेशंट वाढत आहेत. मुंबईबद्दल तर आपण विचारच करू शकत नाही. मालेगावात जे दिसतंय ते फक्त नमुन्यादाखल आहे... अख्ख्या शहराची तपासणी केली तर मालेगावातील सत्तर टक्के लोक आज कोरोना पॉझिटिव्ह निघतील. भावांनो हे असेच सुरू राहिले तर तिथली आहे ती दफनभूमीसुद्धा पुरणार नाही. 
           महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण हे मुस्लिम समाजातील आहेत! सर्वात महत्वाची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मृत पावणारे सुद्धा सर्वात जास्त मुस्लिमच आहेत. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे नाही का हे? एकेका कुटुंबातील पाच पाच माणसे पॉझिटिव्ह येत आहेत. अतिशय कमी जागेतील दाटीवाटीची घरे, एकेका घरात भरपूर माणसे, वयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष अशा कितीतरी गोष्टी रुग्णांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. समाजपरिवर्तन, क्रांती, हमीद दलवाई, सुधारणा अशा गोष्टींवर चर्चा करण्याची ही वेळच नाही. आज "एकाही व्यक्तीमुळे एकही व्यक्ती बाधीत होता कामा नये" एवढा मूलमंत्र पाळला तरी पुरेसं आहे. लॉकडाउनचा काळ सुरू आहे, रेड झोन मधील लॉकडाउन पुढचा महिनाभर तरी उठणार नाही... अशावेळी तुम्हीच तुमच्या घरातील लोकांना, मुलाबाळांना कोरोनाने बाधित करणार आहात हा धोका समजून घ्या! 
       ''सर्वात जास्त आपल्याच समाजाचे लोक मरत आहेत'' अशा साध्या सरळ भाषेत समाजातील सुशिक्षितांनी अडाणी लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. परवा एक रूग्ण निगेटिव्ह रिपोर्ट येऊन घरी आल्यावर, घरातील लहान-मोठे प्रत्येकजण त्याला आनंदाने मिठी मारत होते... विडीओ पाहून कपाळाला हात लावण्याची वेळ आली.
     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. असे असूनही यावर्षी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जयंतीच्या नावाखाली एकही माणूस रस्त्यावर आला नाही किंवा या आजाराला खतपाणी मिळेल अशी एकही अनुचित घटना घडली नाही... बौद्ध बांधवांकडून इतर समाजाने खूप काही शिकण्यासारखं आहे यातून!  
       डॉक्टर लोक आठ, दहा तास भर उन्हाळ्यात PPE kit घालून काम करत आहेत यामध्ये काही विशेष नाही... आमचं ते कर्तव्यच आहे, दवाखान्यात डॉक्टरने बाधित होणे हे काही नवीन नाही पण आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांना याची बाधा होणे आणि त्यात त्यांचा मृत्यू होणे हे खूप वाईट आहे... ते आपल्यासाठी रस्त्यावर उभे असताना त्यांच्यावर हात उचलणं हे अत्यंत चुकीचं आहे. पोटावर हात असणारा कामगार वर्ग हतबल होऊन एखादेवेळी चुकीचं पाऊल उचलतोय. ते सोडले तर बाकी प्रत्येकजण, प्रत्येक समाज आपले कर्तव्य निभावतोय. प्लाज्मा थेरपीच्या उपचारामध्ये ज्या मुस्लीम बंधु-भगिनींनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे हे खूप मोठे पाऊल आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद!


डॉ. प्रकाश कोयाडे ( YCM Hospital, पुणे) 
७२६४९१०२११