कोरोनामुळे ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबाकडे एकदा बघा. त्यांना त्या व्यक्तीचे शेवटचे दर्शन देखील घडले नाही. मृत व्यक्तीचे पार्थिव थेट रुग्णालयातून कब्रस्तानमध्ये घेऊन जावे लागले, ही वेळ आपल्या कुणावरही येऊ नये हीच इच्छा आहे.
औरंगाबाद दि.१९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी अनेकांनी तुमचे लोक ऐकत नाही अशी तक्रार केली, तेव्हा माझी मान शरमेने खाली गेली. कोरोनाचा धोका ओळखा, तुमच्या हलगर्जीपणामुळे तुमचा तर जीव धोक्यात जाईलच, पण घरातील आई, वडील, आजोबा यांच्या सारख्या वयस्कर लोकांना या व्हायरसचा अधिक धोका आहे. अजूनही वेळ गेलेली नाही लॉकडाऊनचे पालन करा, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना केले.
औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीसवर पोहचली आहे, यापैकी तीन जणांना आपला प्राण देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या शहराचा समावेश धोकादायक म्हणजेच रेड झोनमध्ये केला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुस्लिमबहुल भागातून आढळत असल्याने या भागातील लोक लॉकडाऊनचे पालन न करता सर्रासपणे घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देखील याचे पडसाद उमटले. त्यामुळे ही बैठक पार पडताच खासदार इम्तियाज जलील यांनी थेट कोरोनाचे रुग्ण ज्या भागातून समोर येत आहेत, त्या भागात धाव घेतली.
लाऊडस्पीकरवरून आवाहन करतांना इम्तियाज जलील म्हणाले, गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तुमचे लोक ऐकत नाही अशी तक्रार सगळ्यांनीच केली, तेव्हा मला शरमेने मान खाली घालावी लागली. माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच ही लाजीरवाणी बाब आहे. सरकार, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा आपल्याला कोरोनाचा धोका समजावून सांगत आहेत, पण आपण मात्र बेफिकरीने घराबाहेर पडतो आहोत.
पोलीसांची गाडी आली की पळून जायचे, आणि नंतर घोळक्याने पुन्हा चौकात येऊन उभे राहायचे हे प्रकार बंद करा. कोरोनाचे रुग्ण किराडपुरा, बायजीपुरा, आरेफ कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी या भागातूनच अधिक का आढळत आहेत याचा जरा विचार करा? अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, दूध या रोजच्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडावे लागते हे मान्य असले तरी घरातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडणे अपेक्षित आहे.
पण सगळेच घराबाहेर पडले तर कोण कोरोनाचा विषाणू घेऊन परतेल याचा नेम नाही. कोरोनामुळे ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबाकडे एकदा बघा. त्यांना त्या व्यक्तीचे शेवटचे दर्शन देखील घडले नाही. मृत व्यक्तीचे पार्थिव थेट रुग्णालयातून कब्रस्तानमध्ये घेऊन जावे लागले, ही वेळ आपल्या कुणावरही येऊ नये हीच इच्छा आहे. शहराचा खासदार म्हणून नाही, तर तुमचा मुलगा, भाऊ म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, कृपया घराबाहेर पडू नका असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले.
रमझानमध्ये घरातच नमाज अदा करा...
लॉकडाऊनमध्ये लवकरात लवकर बाहेर पडणे आपल्या हातात आहे. पण त्यासाठी पोलीसांच्या सूचनेचे पालन करावे लागले, तरच कोरोनाच्या संकटातून आणि लॉकडाऊनमधून आपण बाहेर पडू शकतो.
शहरातील परिस्थिती सुधारली, आणि रुग्ण संख्या शून्यावर आली तर आपण लॉकडाऊन हटवण्याची सरकारकडे मागणी करू शकतो. पण पुढच्या आठवड्यापासून रमाझान सुरू होत असला तरी आपण सगळ्यांनी घरातच नमाज अदा करावी, फळ खरेदी करण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जलील यांनी यावेळी केले.
***