राज्यातील लोककलावंतांच्या मदतीला धावली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट…


मुंबई दि.17: राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली आहे.


कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजूर असतील किंवा दुर्लक्षित आणि हातावर पोट असणारे, यामध्ये सर्वात दुर्लक्षित घटक महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंत आहेत. आता त्यांच्या सगळ्या बार्याध बंद झाल्या आहेत. यावर्षी कुठेही त्यांना काम मिळणार नाही. या सगळ्याची नोंद भटक्या विमुक्त जमातीचे नेते लक्ष्मण माने हे करत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लोककलावंतांची ही व्यथा लक्ष्मण माने यांनी मांडली होती. त्यानुसार तात्काळ या दुर्लक्षित लोककलावंतांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा उपक्रम हाती घेण्यात येईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.


आता राज्यातील वेगवेगळ्या भागात फडामध्ये व अन्य ठिकाणी राहणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांची यादी, गाव आणि बॅंक खाते यांची नोंदही घेण्यात आली आहे. राज्यातील जवळपास ५ हजार भटक्या विमुक्त जमातीतील लोककलावंतांची नोंद झाली असून त्यांच्या बॅंक खात्यात उद्यापासून पहिला टप्पा म्हणून शुक्रवारपासून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत, असेही आ. हेमंत टकले यांनी सांगितले.
***