… अखेर आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण


मुंबई : दीड वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेच्या निमित्ताने अटक टाळणारे आरोपी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या समोर आत्मसमर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन फेटाळला. तसेच एका आठवड्यात ‘एनआयए’च्या स्वाधीन व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच बजावले होते.


तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी मुंबईतील कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात आनंद तेलतुंबडे पोचले असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.


अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिलं होतं. अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता.


मात्र पुढे मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. नंतर ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली होती. ही मुदत काल संपुष्टात आली. आज मंगळवारी दुपारी एनआयएच्या कार्यलयात आनंद तेलतुंबडे व गौतम नवलखा यांनी शरणागती पत्करल्याचे समजते.


दरम्यान,वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आमदार कपिल पाटील, तेलतुंबडे यांच्या पत्नी रमा तेलतुंबडे, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आदी तेलतुंबडे यांच्यासोबत एनआयए कार्यालयापर्यंत आले होते. यावेळी कोणतीही गर्दी करण्यात आली नव्हती.
***