- तीन आरोपींना पोलिसांनी - केली अटक
धमकावण्याचे प्रकार सहन करणार नाही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र त्यांना अशाप्रकारे मारहाण होत असेल तर चुकीचे आहे. पालिका कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. यापुढे कर्मचाऱ्यांना मारहाण व धमकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. - रामदास पाटील, मुख्याधिकारी, हिंगोली नगरपालिका
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली : हिंगोली शहरातील मस्तानशाहा नगर भागामध्ये निर्जंतुकीकरणाचे काम करणाऱ्या सफाई कामगारास मारहाण करणाऱ्या सात जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सुरू केलेले कामबंद आंदोलन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले हिंगोली शहरांतील मस्तानशाहा नगर भागामध्ये मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पालिकेचे सफाई कामगार निर्जंतुकीकरणाचे काम करत होते. या वेळी सात ते आठ जणांनी ट्रॅक्टर चालक अफसर खान पठाण यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडले होते. त्यानंतर अफसरखां पठाण यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री शेख अहमद शेख राजा, शेख रशीद जुबेर मिस्त्री, शेख बब्ब शेख राजा शेख गुलशन शेख सलीम, शेख जावेद शेख गफार, शेख बाबू शेख राजा यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू करून पालिका कार्यालयासमोर ठाण मांडले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी पालिकेचे मुख्याधिकारी पाटील यांच्याशी संवाद साधून कडक कारवाईचे आश्वासन दिले तसेच सध्याच्या परिस्थितीत कामबंद आंदोलन करू नये, असे सांगितले. लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दुपारी बारा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
***