लॉकडाउनमुळे १२ कोटी बेरोजगार, प्रत्येक कुटुंबाला किमान साडेसात हजारांची मदत हजार द्या”


बेरोजगारीतही पुढील काळात वाढ होण्याची शक्यताही यावेळी व्यक्त करण्यात आली.


सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मजूर वर्गाचे तसंच हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं त्वरित ७ हजार ५०० रूपये देण्याची मागणी केली. अनेक वैद्यकीय कर्मचारी कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय काम करत आहेत. आपण या सर्व करोना वॉरिअर्सना सलाम केला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.


लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांनी रोजगार गमावले आहेत. आर्थिक कामे रखडली असताना बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ७ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत देणे आववश्यक आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी टेस्टिंग किट्सवरही निशाणा साधला. पीपीई किट्सची कमतरता आणि त्यांच्या गुणवत्तेबाबत सोनिया गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या करोनाच्या होणाऱ्या चाचण्यांची संख्या खुप कमी आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही आरोप केले. करोनाशी लढताना चाचण्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीतही चाचण्या कमी होत आहेत. तसंच पीपीई किट्सची गुणवत्ताही योग्य नाही. आम्ही अनेक सूचना केल्या. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.


***