आरोग्य कर्मचाऱ्यांंवर हल्ला केला तर तो आता अजामीनपात्र गुन्हा असेल : केंद्र सरकार


नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संकटात खंबीरपणे उभ राहून डॉक्टर्स, नर्स, आणि इतर आरोग्य कर्मचारी आपले रुग्ण सेवेचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र काहीवेळा तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरचं नागरिक हल्ला करत आहेत. याची आता केंद्र सरकारने दखल घेत डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा असेल असा आदेश काढला आहे.


केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती आज दिली. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून, बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या महारोगराईपासून देशाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने लोकांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पण त्यांच्यावरील हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. डॉक्टरांविरोधात हिंसाचार किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.


यासाठी एक अध्यादेश काढण्यात आला असून, तो राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर लागू केला जाणार असल्याचंही जावडेकरांनी स्पष्ट केलं आहे. आता वैद्यकीय पथकावर हल्ला केल्यास 3 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होणार आहे. तसेच 50,000 ते 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. जर गंभीर नुकसान झाले तर 6 महिन्यांपासून 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच 1 लाख ते 5 लाख रुपये दंड करण्याची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.


***