लेखन - समिर.एस.शिकलगार (इस्लामपूर)मो. +91 70669 80104. व कुमार.आर.पोवार (वैभववाडी)
लाॅकडाऊनमुळे लाॅक झालेले आपल्या सर्वांचे विचार अनलाॅक झाले खरे पण ते समुद्राच्या दिशाहीन लाटेसारखे व्हाॅटसअॅप,फेसबूक,इन्स्टा,मेसेंजर नावाचे जे सोशल मिडीयाचे किनारे आहेत त्यावर ज्ञान-अज्ञान होऊन थडकताहेत.
मग याआधी ही जवळीक..हे डेअर्सचे अॅप..एकमेकांविषयीची छान मतं..आपुलकी..माया..प्रेम..जवळीक..ते जुने छायाचित्र पाहुन दाखवलेला आपलेपणा..स्टेटसला ठेवलेली आपल्या माणसांची छायाचित्र अन या सर्व आठवणी याआधी कुठे होत्या?
खरच लाॅकडाऊन कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासुन आपलं संरक्षण करण्यासाठी आहे? का निवांत वेळ मिळालाय म्हणुन आपण सगळेच या बहाण्याने मोबाईल अॅडिक्ट होऊन बसणार आहोत..
कोरोना हा एक विषाणू आहे तो एक ना एक दिवस संपेलच पण मोबाईलमुळे होणारी ही सवय नक्कीच छोटी बाब नाहीये.
आजकाल पब जी मुळे मुलं बिघडत आहेत,मोबाईल घेऊन बसतात,लक्ष देत नाहीयेत असं म्हणणारे पालक ही या लाॅकडाऊनच्या काळात मोबाईलच्या विळख्यात दिसत आहेत...!
जो तो आपलं प्रेम,आत्मियता या सोशल मिडीयावरून व्यक्त करताना दिसत आहेत.जे या सोशल मिडीयाचा अधिक वापर करणं टाळत होते ते ही हल्ली त्यात अडकलेले दिसताहेत.
खरतर आपण सोशल मिडीयावरून या रोगाविषयी एकमेकांना काळजी घ्या असं सांगु शकतो, किंवा टिकटाॅकसारख्या अॅपचा वापर करून जागृती आणु शकतो पण आपण त्याचा वापर फक्त वेळ घालवण्यासाठी करतोय इतकच..
आपला मित्रपरिवार कोण आहे हे सोशल मिडीयावरून दाखवण्यापेक्षा हा आपला देश एक कुटुंब आहे आणि त्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण पार पाडायला हवी.
ही झाली एक बाजु आता दुसरी बाजु पाहीली तर याहुन भयंकर अनुभव येतो तो म्हणजे बाहेर पडण्यास मज्जाव असतानाही काही शिकले सवरलेले या कायदयाला न जुमानता उगाच बाहेर पडतानाही दिसताहेत.
खाकी वर्दीला डीमांड आहे पण त्या खाकी वर्दीची भीती कुठेतरी कमी होताना दिसते आहे.आजच्या पिढीला म्हणावी तितकी भीती उरलेलीच नाहीये अगदी उलटं बोलण्यापासुन ते वाद घालण्यापर्यंतचे प्रकारही घडताना दिसताहेत...
दुसरी बाजु अशी की काही लाचखाऊ पोलिसांमुळे इतर इमानदार पोलिसांना काही वेळा परिस्थिती नियंत्रित करताना अडथळा येतो. काही स्वत:ला मोठे म्हणवणारे पोलिसांच्या डोळ्यासमोरून जातात कारण 'मालिक मैने आपका नमक खाया है' यातच सगळं आलं.ते रोडवरून फिरतात तर आपण का जाऊ शकत नाही असे म्हणणारे आपले नागरिक तशीच बाहेर पडण्याची कृती करताहेत.
एखादा अडाणी माणूस जेव्हां आपल्यासमोर चार शहाणपणाच्या गोष्टी करतो त्यावेळी आपण खुप शहाणा झालास का? असं बोलुन मोकळे होतो पण आज सुशिक्षित माणूस अडाण्यासारखं वागत असेल तर काय म्हणावे या सुशिक्षित माणसांना!
तिसरी बाजु म्हणजे सोशल मिडीयावर आलेल्या कुठल्याही बाबीला अभ्यास न करता मान्य करणं अन त्यावर टिपण्णी देणं रोजच सुरू आहे.याचा परिणाम म्हणजे कोरोना रोगाने आता धार्मिक रूपही धारण केलय अन तो सुद्धा एक नवीन विषाणू आपल्या देशात असलेल्या जुन्या धार्मिक विषाणूला बळ देत आहे यामुळे खुप गढुळ परिस्थिती झाल्याचेही नजरेत येत आहे..
प्रत्येकजण आपल्या विचारसरणी नुसार त्यावर टिपण्णी करत आहे आणि हा धार्मिक विषाणू कोरोनाच्या आडाने वाढताना दिसत आहे आणि आपण तरीही स्व:तला आम्ही सुशिक्षित आहोत असं म्हणवुन घेतोय..!
सोशल मिडीयावर मन मोकळं व्हावं,भावना रीत्या व्हाव्यात,विचारांची देवाण-घेवाण व्हावी पण त्याला अभ्यासपुर्णताही असणं तितकच गरजेचं आहे.
प्रत्येकाने विचार करायला हवा की मागच्या पंधरा दिवसात आपण सोशल मिडीयाचा इतका वापर केला,संवाद साधला,आपल्या माणसांशी बोललो,व्यक्त झालो पण ते सध्या वेळ आहे म्हणुन मग याआधी आपण का सोशल मिडीयावर आपलं स्थान दर्शवत नव्हतो मग आत्ताच एवढा अट्टाहास का?
आजही काही माणसं आहेत जी नेहमीच सोशल मिडीयावर असतात आणि अभ्यासपुर्ण रितीने आपली मतं प्रकट करत असतात ते आजही दिसतात पण त्यांच्या टिपण्ण्या या अभ्यासाच्या जोरावर केलेल्याच आढळून येतात.
तुम्ही म्हणाल मग सोशल मिडीयावर आपण असू नये का? तर असावं पण त्यामधे सलगता हवी,विचारसरणी हवी,समाजाला काहीतरी संदेश देण्याची मानसिकता हवी आणि बुद्धीची झापडं नेहमी उघडी हवी...वाचन,लेखन,मनन,चिंतन, याच्या जोरावर उहापोह व्हायला हवा...
हसायला हवं,व्यक्त व्हायला हवं,मतं मांडायला हवीत,संवाद व्हायला हवा,टिपण्णी करायला हवी,पण त्याला अभ्यासाची बाजूही असणं गरजेचं आहे असं वाटत नाही का!
लाॅकडाऊनची आणखी एक बाजु मांडायचं झालं तर इतर वेळी आपण पाय मोकळे करण्यासाठी फिरायला जात नाही किंवा काहीजण जातातही पण या काळात न जाणं यथायोग्य असतानाही काही लोक त्या बहाण्यानेही बाहेर पडताना दिसताहेत काही ग्रामीण भागात गाडी घेऊन शेजारील गावात जाऊन फेरफटका मारणे,पोहायला जाणे ही खरतर निर्लज्जपणाची लक्षणं आहेत याचाच अर्थ परिस्थितीचे म्हणावे तितके गांभीर्यच राहिलेले नाही..
एरवी या धावत्या जगात साधा स्वत:कडे बघायला वेळ नसतो आपण आपली नाती बाजुला ठेऊन नुसते पैशाच्या मागे धावत राहतो तेव्हां मात्र सोशल मिडीयावर कुठलंही नातं स्पष्ट होताना दिसत नाही पण सध्या सगळेच निवांत असल्याने नाती वगैरे,आठवणी,मित्र परिवार यावर प्रकर्षाने प्रेम दाखवलं जात आहे तशी ही बाब चांगली आहे की आपण नाती जपतोय पण मग यामधे सलगता का येत नाही..ही परिस्थिती आहे आणि मोकळा वेळ आहे म्हणुनच हे सर्व सुरूय का असाही एक विचार मनोमन करायला हवा.!
लाॅकडाऊन सुरू झाल्यापासुन काही लोकांनी खरच छान उपयोग केला आहे या सोशल मिडीयाचा तो असा की एरवी भेटणं वगैरे शक्य होतं पण काहीजणांनी ऑनलाईन काव्य मैफीली घेतल्या आता उदाहरण दयायचं झाल्यास आमच्या ओळखीची तळेगाव दाभाडेत राहणारी एक मैत्रीण आहे तेजस्विनी गांधी तर त्यांनी सर्व मित्रपरिवारासोबत एक छान अशी ऑनलाईन काव्य मैफील घेतली आणि आता ते 'ख़याल' नावाची ही एक मैफील घेताहेत ज्यात एक विषय निवडून त्यावर कवीता,गझल,शायरीज सादर केल्या जातात. तसा विचार केला तर ही कौतुस्कापद बाब आहे कारण लाॅकडाऊनच्या काळातही त्यांची ही सलगता ऑनलाईन माध्यमातून टिकून आहे. त्यांच्यातीलच काहीजण कोरोनावर कवीता करून सोशल मिडीयावर टाकताहेत व त्यातुन समाजप्रबोधनाचं कामही करताहेत...
काहीजण कोरोनावर मात करण्याचं बळ वाढावं म्हणुन त्यावर आधारित गाणी लिहुन ते छायाचित्रण स्वरूपात फेसबुकसारख्या माध्यमातुन जनमाणसांपर्यंत पोहचवत आहेत.
काहीजण सोशल मिडीयावरून विविध प्रकारे प्रबोधनात्मक कामही करताहेत...!
खरतर सोशल मिडीयाच्या वापराला विरोध नाहीच आहे पण ज्या नात्यांशी आपण या काळात इतके छान जोडले गेलो आहोत आणि इतकी आपुलकी,प्रेम,माया,आपलेपण जे आपण विविध बाबींतुन दाखवत आहोत त्यामधे थोडा काळजीचा सुरही एकत्र करूयात आणि आलेल्या या संकटावर मात करूयात,कायद्याचं पालन करूयात,सुचना अंमलात आणुयात,त्या पाळुयात अन पाळायलाही लावुयात...या संकटाच्या निमित्ताने जी नातीसंबंधाची जोपासना सोशल मिडीयावरून सुरूय ती भविष्यात सलगतेत आणुया अन अशीच नाती चांगल्या काळातही जपुयात!
आणि डाॅक्टर,वैदयकीय क्षेत्रातील बाकी लोक,आरोग्य विभागाची माणसं,पोलिस हे देवासारखे धावून आलेत व आपले कर्तव्य कष्टाने व प्रामाणिकपणे पार पाडताहेत.या कठीण परिस्थितीत शासनही न डगमगता आपली भूमिका पार पाडत आहे.आपल्या देशातील टाटां सारखी काही दानशूर माणसं या कोरोनावर मात करण्यासाठी मदत म्हणुन सढळ हाताने मदत करताहेत...तसेच आपण ही या देशाचे नागरिक म्हणुन आपलं कर्तव्यही पार पाडायला हवं आणि योग्य अयोग्य गोष्टी लक्षात घेऊन तशी कृती करायला हवी व घरीच राहुन या लाॅकडाऊनच्या माध्यमातुन कोरोनावर मात करायला हवी मग हा विजय आपल्या सर्वांचा ठरेल...
आणखी एक गोष्ट म्हणजे घरी राहुन काही चांगल्या कृतीशील गोष्टी करायला हव्यात..ऑनलाईन मैफीली,ऑनलाईन चर्चा,काही व्हिडीओज करून जनजागृती,हातावर पोट असलेल्यांना आपल्या हातुन होईल तेवढी मदत करायला हवी किंवा जी संस्था असं काम करते त्यांना पाठिंबा देऊन सहकार्य करायला हवं..!
या कोरोनामुळे धार्मिक तेढही निर्माण होताना दिसत आहे तर आपण सर्व गोष्टींची शहानिशा करून मगच सोशल मिडीयावर त्याबाबत आपलं मत नोंदवायला हवं...आजचं विचित्र आहे या रोगाच्या विषाणूसोबत हा धार्मिक असंतोषाचा अन वादाचा विषाणूही आपल्या देशात पाय पसरतोय...तेव्हां सरकार यावर योग्य ती पावलं उचलत आहे. आपण घरात बसून फारसं माहित नसताना अक्कल पाजळणे गरजेचे आहे का? यावर ही विचार करायला हवा...
शासन व तज्ञ यांच्याकडून कोरोनावर मात करण्यासाठी विचारात्मक पावले उचलली जात आहेत तरी आपल्यातील काहीजण त्यांना नावे ठेवण्याचं काम करताहेत जर तुमच्याकडे उपाय आहेत तर तुम्ही का सांगत नाही?नुसता बोलबाला का सुरूय?आपल्याला फक्त साथ दयायची आहे तरीही आपण इतकी दिरंगाई करतोय आणि बेजबाबदारपणे वागतो आहोत. डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी,पोलिस,सामाजिक संस्था यांच्या कार्याची थोडी तरी किंमत ठेवुयात आणि घरीच राहुन सुचनेचं पालन करून आपण सर्वजण साथ देऊयात...
तुम्ही तुमच्या दिनचर्येचे स्टेटस लावुन..ते सोशल मिडीयावर टाकुन भूमिका बजावत आहात का? ते डेअर वगैरे खेळुन अन ते पुर्ण करून वेळ घालवत आहात?26 जानेवारी..15 ऑगस्टला अभिमानाने स्टेटस लावुन देशप्रेम जाहीर करतो मग आज या महासंकटाच्या काळात आपण नागरीक या नात्याने देशासाठी योग्य ती भूमिका बजावत आहोत का? याचाही विचार करायला हवा.
रतन टाटांसारख्या माणसापेक्षाही जास्त फाॅलोअर्स टिकटाॅकवाल्यांचे दिसतात खरतर टिकटाॅकवर असणं वाईट नाही पण आता वेळ आली आहे तर त्याचाही योग्य वापर करता येऊ शकतो...मग त्यांनी योग्य अशी कामगिरी बजावून माणसांपर्यंत या माध्यमाद्वारे कोरोनासंबंधी माहीती पोहचवायला काय हरकत आहे..अन टाटांसारख्या माणसांशीही आपण सोशल मिडीयावरून जोडलेलं राहणं गरजेचं आहे कारण याच आदरणीय व्यक्ती आपल्या देशाला संकटात नेहमी बळ देत असतात...
आपण समाजाचं थोडं देणं लागतो या उक्तीप्रमाणे थोडसं आपणही आपल्या परीने गोरगरीब,गरजू व हातावर पोट असलेल्यांना थोडं सहकार्य करूच शकतो आणि ते आपण करूयाच.बाकी फार काही सांगायला नको कारण आपल्या सर्वांची जाणिवेची पातळी जिवंत आहेच...
तसेच आपल्या आसपास जे मुके प्राणी आहेत त्यांच्यावरही आपण लक्ष ठेवुन त्यांना आपल्यातलाच थोडा भाकरीचा तुकडा देऊन भूतदया दाखवुयात कारण ती ही आपली जबाबदारी व संवेदना जिवंत असल्याचं लक्षण आहे...
प्रत्येकजण आपल्या विचारसरणीनुसार आपलं मत व्यक्त करताना दिसतो आहे.आधीच धार्मिक मुद्दे कमी की काय त्यात आपले स्टेटस ही कोरोना सोबत धार्मिक तेढीचे अन धर्मांधाचे दिसताहेत..थोडी विचारधारा बदलुयात अन अभ्यासात्मक असं मत व्यक्त करूयात...
त्याचबरोबर मोकळ्या वेळेत आपण छान असं खुप काही करू शकतो जे भविष्यात आपल्या कामी येऊ शकेल.आणि स्टेटसला दिसलेली नाती पुढेही जपुयात तर काय म्हणता!
बाकी आपण सर्वच सुज्ञ आहोत अन याआधीही अशा संकटांचा आपण मिळुन सामना केलेला आहे.संकट मोठं असलं तरी आपली सकारात्मकता अन इच्छाशक्ती मोठी ठेवुयात!
तर चला या लाॅकडाऊनच्या लढाईने आपण सर्व या कोरोना नावाच्या भयंकर संकटावर मात करूया व आपला भारत देश यातुन मुक्त करूयात!
जय हिंद....जय भारत!