देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, केली ‘ही’ मागणी


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपते आहे. प्रादेशिक असमोल दूर करण्याबाबत या मंडळांची भूमिका आणि मदत आत्तापर्यंत अतिशय महत्त्वाची राहिली आहे हे आपण जाणताच. असं असलं तरीही अद्यापही प्रादेशिक असमोतल दूर करण्यात १०० टक्के यश आपण गाठू शकलो नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.


नियोजनात्मक पातळीवर अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या या मंडळांना मुदतवाढ देणं आवश्यक आहे. तशी कारवाई आपण लगेच करावी ही विनंती करण्यासाठीच पत्र लिहित आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.


कोविडनंतरच्या काळात जागतिक पातळीवर काही ट्रेड बॅरियर्स निर्माण होण्याची शक्यता पाहता लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) व्यापक संधी निर्माण होतील, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंटस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये संबोधित करताना ते बोलत होते. चेंबर्सचे विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अमरावती आणि इतर ठिकाणाहून अनेक मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. करोना लॉकडाउनच्या काळातील अडचणी, त्यावर सध्या केले जात असलेले उपाय, येणार्‍या काळात करावे लागतील असे उपाय, लघु आणि मध्यम उद्योजकांना येणार्‍या समस्या आणि नवीन संधी, निर्यात धोरणात आवश्यक बदल, उद्योजकांना खेळते भांडवल अशा अनेक विषयांवर प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले आणि शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.


***