सार्वजनिक वाहतूक येत्या 10 दिवसात सुरु करणार, नितीन गडकरींची माहिती


नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि सार्वजनिक वाहतूक बंद आहे. ही वाहतूक आता येत्या दहा दिवसात सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.


ते म्हणाले की, आता सार्वजनिक प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होईल. दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्यावर विचार सुरु आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेन.


गेली अनेक दिवस देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र ही वाहतूक कधी ना कधी सुरु करावी लागेलच. त्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.


यावेळी नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोनावरही भाष्य केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबई संकटात आहे. या ठिकाणी काही चुका होत असतील, काही तक्रारी असतील तर मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. आम्ही सगळे मिळून या संकटाशी मुकाबला करण्यासाठी काम करत आहोत. लवकरच आम्ही या संकटातून बाहेर येऊ, गडकरी म्हणाले.


***