आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यात कोरोना ची परिस्थिती हाताळण्यास राज्यसरकार अपयशी ठरलं असं म्हणत आंदोलन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. तसंच येत्या काळात राज्यात कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या वाढेल. असं देखील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?
मुस्लीम बांधवांनी यासाठी दुवा मागा…
सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो, कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा.
राज्यात 33 हजार अॅक्टीव्ह रुग्ण -
मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता, आज 33 हजार 786 अॅक्टिव्ह रुग्ण, 47 हजार हा एकूण आकडा, जवळपास 13 हजार कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत 1577 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
‘हा’ चमत्कार -
कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार, मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी आली.
रक्तदान करा -
राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज, पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे.
पावसाळ्यात काळजी घ्या -
पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या. सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा.
लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? फडणवीसांवर निशाणा
पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्ववर्गासाठी मदत.
पॅकेज घोषित कशाला करत बसायचं?
महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली.
मारू बोंब …? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला -
केंद्राकडे पैसे अडकलेत, पीपीई किट ला परवानगी उशीरा मिळाली, धान्याचा प्रश्न आहे, रेल्वे तिकिटांची समस्या…. मारू बोंब? नाही. मी राजकारण करणार नाही. संकटाचा काळ आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपतोय.
परप्रांतीय कामगारांच्या प्रवासासाठी 85 कोटी -
राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी ४८१ ट्रेन सोडल्या, त्याने सहा ते सात लाख मजूर गावी, ८५ कोटी रुपये खर्च.तीन लाख 80 हजार जणांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं, 75 कोटी रुपये खर्च
शेतकऱ्यांना बांधावरच बियाणं, खतं कशी उपलब्ध करुन देता येतील याचा विचार सुरू
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा प्रयत्न, 75 ते 80 टक्के कापूस खरेदी, राजकारण करू नका, तुम्ही सुरु केलं तरी आम्ही करणार नाही,
महाराष्ट्राची आमच्यावर जबाबदारी आणि विश्वास, आमचं मंत्रिमंडळ त्याला तडा जाऊ देणार नाही
‘लॉकडाऊन’ शब्द वापरु नका -
लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही, आता ‘लॉकडाऊन’ शब्द वापरु नका, हळूहळू आयुष्याची गाडी मार्गावर आणू, पुढील काही महिने मास्क घालावे लागतील, सतत हात धुवावे लागतील, एकमेकांपासून अंतर राखणे, रस्त्यावर न थुंकणे.
चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला मर्यादित स्वरुपात परवानगी देण्याचाही विचार सुरू आहे
***