लॉकडाऊनची सर्वात मोठी झळ मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांना पोहोचली आहे. शासन मदत निधी देण्यापुरते मर्यादित राहील काय? असा प्रश्न जनतेतून निर्माण झाला आहे.
जळगाव, 11 मे: कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व व्यवस्थाच विस्कळीत झाली आहे. लॉकडाऊनची सर्वात मोठी झळ मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांना पोहोचली आहे.
मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्यांसमोर एक वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमुळे मध्यप्रदेशातून जळगाव येथे मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील एका 17 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे. अनिता खेमचंद चव्हाण असं मृत तरुणीचं नाव आहे.
अनिताच्या पश्चात कुटुंबात वडील व 3 लहान भाऊ आहे. आईच्या मृत्यूनंतर अनितानेच भावंडांचा सांभाळ केला. वडील व भाऊ हे मोलमजुरी करून आलेल्या पैशात अनिता घरातील उदरनिर्वाह भागवत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे रोजगाराचे साधन बंद झालं. त्यामुळे कुटुंबाची भूक भागवायची कशी? हा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊननंतर सुरुवातीच्या काळात काही स्वयंसेवी संस्था काही अन्नदाते व शेजारी-पाजारी यांच्याकडून जेवण तर कधी धान्य मिळत होते. पण नंतर मात्र तेही बंद झालं.
रोज-रोज कोणापुढे हात पसरवायचे असा प्रश्न अनिता समोर उभा होता. त्यात दोन लहानगे भाऊ आणि त्याची सातत्याने होत असलेली उपासमार हे अनिताला असह्य होत होतं. त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
एकीकडे शासन सांगते आहे की राज्यात कोणाचीही उपासमार होणार नाही. कोणीही उपाशी झोपणार नाही. याकरीता शासन प्रयत्न करत आहेत. मात्र अनिता व तिच्यासारखे असंख्य गरीब कुटुंबांवर उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे, अनिता चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीनंतर काय ते स्पष्ट होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे.
***