देशातील 22 विरोधी पक्षांची बैठक संपली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती सर्वासाठी आश्चर्य


कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांची बैठक बोलवली होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती.


केंद्र सरकारने नुकतंच 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजमध्ये गरिबांना कोणतीही मदत आली नसल्याचा आरोप कॉंग्रेस ने केला आहे.


आज सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला 22 पक्ष उपस्थित होते. महाराष्ट्रातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहिले. माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा, डीएमके नेते एम के स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.


काय झालं बैठकीत?


या बैठकीत सोनिया गांधी यांनी कोरोना च्या आधीच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं अर्थव्यवस्था कशी ढासळत गेली होती. हे आकड्यांचा दाखला देत स्पष्ट केलं.


या बैठकीत कोरोनाच्या संकटाला तातडीनं राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, राज्यांना हे संकट झेलण्यासाठी तातडीनं मदत करा अशी मागणी देशातल्या या सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केली आहे.


भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटाच्या आधीच घरघर लागली होती. 2017 च्या मध्यापासूनच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था गोत्यात आली होती.


सलग 7 तिमाहींमध्ये जीडीपीची घसरण झाली होती. ही साधी गोष्ट नव्हती. कोरोना म्हणजे 21 दिवसांचं युद्ध आहे असा भ्रम मोदींनी सुरुवातीला देशापुढे तयार केला.


सरकारकडे लॉकडाऊनमधून कसं बाहेर पडायचं याची रणनीती नाही. काँग्रेससह समविचारी पक्षांनी अशा संकटात गरिबांच्या खात्यात थेट मदतीची मागणी केली होती. पण सरकारनं त्याकडे कानाडोळा केला.


या शब्दात कॉग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.


यांनी फिरवली पाठ…
समाजवादी पक्ष, बसपा, आम आदमी पक्ष यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.


***