हिंगोली जिल्ह्यात 72 हजार शिवभोजन थाळीचे वितरण - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


हिंगोली,दि.05: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गरीब व गरजु व्यक्तींना स्वस्तदरात पाच रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध होत असून आजपर्यंत जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामार्फत सुमारे 72 हजार थाळींचे वितरण करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली.


हिंगोली जिल्ह्यात एकूण 09 शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये हिंगोली शहरात 03 शिवभोजन केंद्र तर कळमनुरी तालुक्यात 02 सेनगाव तालुक्यात 01, औंढा ना. तालुक्यात 02  आणि वसमत तालुक्यात 01 शिवभोजन केंद्रामार्फत गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ देण्यात येत आहे. तरी कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.


*****