दहा सर्वाधिक करोनाबाधित देशांमध्ये भारत..!


देशभरात करोना रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ झाली असून जगभरातील सर्वाधिक दहा करोनाबाधित देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. सलग चौथ्या दिवशीही रुग्णांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात ६,९७७ नव्या करोना रुग्णांची भर पडली.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ५७,७२० रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४१.५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,२८० रुग्ण बरे झाले. ७७,१०३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एकूण मृत्यू ४,०२१ असून रविवारी दिवसभरात १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत अनुक्रमे ६०८८, ६६५४, ६७६७ आणि ६९७७ अशी वाढ झाली आहे. रुग्ण दुपटीचे प्रमाण १३ दिवस असून मृत्यूचा दर २.९ टक्के इतका आहे.



  • ३० लाख नमुना चाचण्या -



केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितानुसार, देशभरात ४२२ सरकारी व १७७ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज दीड लाख नमुना चाचण्या केल्या जात आहेत. आत्तापर्यंत सुमारे ३० लाख नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या देशात ९६८ करोना रुग्णालये असून त्यामध्ये २ लाख ५० हजार ३९७ खाटा उपलबध आहेत. २,०६५ करोना आरोग्य केंद्रे असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार खाटा आहेत. ७०६३ सेवाकेंद्रे असून त्यामध्ये ६ लाख ४६ हजार खाटा आहेत. आता देशात पुरेशा संख्येने एन-९५ मास्क व पीपीईची निर्मिती केली जात आहे. आत्तापर्यंत ७२.८ लाख पीपीई आणि १ कोटींहून अधिक एन-९५ मास्क पुरवण्यात आले आहेत.



  • सर्वाधिक करोनाबाधित दहा देश -



  1. अमेरिका- १६ लाख ४३ हजार

  2. ब्राझील- ३ लाख ६३ हजार

  3. रशिया- ३ लाख ४४ हजार

  4. ब्रिटन- २ लाख ६० हजार

  5. स्पेन- २ लाख ३५ हजार

  6. इटली- २ लाख २९ हजार

  7. फ्रान्स- १ लाख ८२ हजार

  8. जर्मन- १ लाख ८० हजार

  9. तुर्की- १ लाख ५६ हजार

  10. भारत- १ लाख ३८ हजार


***