हिंगोलीत करोना वॉरियर्स म्हणून सरसावले तृतीयपंथी


एसआरपीएफच्या जवानांना करोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानं सध्या चर्चेत असलेल्या हिंगोलीत आता तृतीयपंथी प्रशासनाच्या मदतीला सरसावले आहेत. करोना योद्धे बनून ते लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करत आहेत.


हिंगोली: शहरात संचारबंदी व सोशल डिस्टन्सिंग राखण्या संदर्भात प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दहा तृतीयपंथी करोना योद्धे म्हणून नगरपालिका कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.


हिंगोली शहरात एक दिवसाआड जीवनावश्यक वस्तू खरेदीची मुभा देण्यात आली आहे. परंतु यामध्ये नागरिकांच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. याबाबत नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह दंड आकारण्याचे काम देखील करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी शहरातील दहा तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी देखील त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून तृतीयपंथीयांना करोना योद्धे म्हणून कर्मचाऱ्यांसह सहभागी करून घेतले आहे. आज सकाळपासूनच या तृतीयपंथीयांनी शहरातील बाजारपेठ व भाजीपाला खरेदी केंद्रावर जाऊन नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या.


कामाचा मोबदला देणार देणार - रामदास पाटील मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगोली
नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यात उतरलेल्या या तृतीयपंथीयांचे निश्चितच कौतुक करावे लागेल. लवकरच त्यांना ओळखपत्र, उन्हापासून संरक्षण करण्याकरिता टोप्या, शिट्टी व कामाचा मोबदला देण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.


***