हिंगोली जिल्ह्यात कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मजूराची नैराश्‍येतून गळफास घेऊन आत्महत्या...


वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथील एका 50 वर्षीय मजूराने कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने नैराश्‍येतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी (20 मे) रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथे साहेबराव मुंजाजी भोकरे (50) हे कुटुंबियांसह राहतात. घरी उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने त्यांना रोजमजूरी करून उदनिर्वाह करावा लागतो. त्यांची दोन मुले पुणे व अहमदनगर ठिकाणी कामाला गेली आहेत. तर एक मुलगा व पत्नी गावात राहतात. दररोज मिळालेल्या रोजमजूरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू असून त्यामुळे हाताला काम राहिलेले नाही. या परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. सोमवारी (18 मे) ते घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नसल्याने त्यांचा मुलगी व पत्नी यांनी त्यांचा शोध सुरु केला. परिसरातील सर्व शिवारामध्ये त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी (19 मे) साहेबराव भोकरे यांचा मृतदेह आंबाळा शिवारात एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजानन भोपे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात विजय साहेबराव भोकरे यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात माहिती दिली. कोरोनामुळे हाताला काम नसल्याने नैराश्‍येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे नमुद केले आहे. यावरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार भोपे पुढील तपास करीत आहेत.
***