विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी


राष्ट्रवादी काँग्रेसनं विधान परिषद निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे आपल्या खंद्या शिलेदारांना संधी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज याबाबतची घोषणा केली.


विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि फर्डे वक्ते अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज याबाबत घोषणा केली. हे दोन्ही उमेदवार विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील, असा विश्वास पक्षानं व्यक्त केला आहे.


सातारा जिल्ह्यातील जावळी व कोरेगावचे आमदार राहिलेले शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वर्षे काम केले असून, यापूर्वी विधानसभेत आमदार या नात्यानेही शशिकांत शिंदे यांनी जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यांचे काम, पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्षानं त्यांना संधी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील बदलत्या राजकीय वातावरणात त्यांच्या आमदारकीचा फायदा होईल, असा राष्ट्रवादीचा होरा आहे.


अकोला जिल्ह्यातील अकोटचे असलेल्या मिटकरी या नव्या दमाच्या नेत्यालाही राष्ट्रवादीनं संधी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिटकरी हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत त्यांनी भाजपच्या विरोधात प्रचाराची राळ उडवून दिली होती. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे.


राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कात्रजचा घाट -
विधानसभेत ४४ आमदारांचे संख्याबळ असणाऱ्या काँग्रेसने महाविकास आघाडीत दोन जागांची मागणी केली होती. राज्यसभेवर बिनविरोध झालेल्या प्रा. फौजिया खान यांना काँग्रेसने सहकार्य केले होते. आता राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्यातील एक जागा सोडावी, असे काँग्रेसचे म्हणणे होते. तर, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मात्र, राष्ट्रवादीने दोन उमेदवार जाहीर करून काँग्रेसला कात्रजचा घाट दाखविल्याची चर्चा आहे.


***