मुंबई : राज्यात राजकीय बदल झाल्यानंतर आता काही गोष्टी देखील बदलणार होत्या हे अपेक्षित होते. भाजपची साथ सोडून आघडीच्या बाजूला येऊन बसलेली शिवसेना भविष्यात कॉंग्रेसच्या बैठकांना हजर राहील यात काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावल्या बैठकीला हजर राहणार असल्याने ही इतिहासातली पहिली बैठक असणार असल्याचं बोललं जात आहे.
येत्या 22 मेला सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शरद पवार आणि अजित पवार हे दोन प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कॉंग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. याशिवाय उद्धव यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोनदा सोनिया गांधींची भेट घेतली आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित करण्याची आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते राहुल गांधींना भेटायला आले होते.
दरम्यान या बैठकीमध्ये कामगारांच्या बदलत्या कायद्यावर चर्चा होणार आहे. भाजपशासित राज्यांकडून कामगार कायद्यात बदल केले जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कामगार कायदा आणि स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाल्यांच्या समस्या या तीन मुद्द्यांवर सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समविचारी पक्षांसोबत चर्चा करणार आहेत.
***