“पायी प्रवास करणाऱ्यांना आत्मनिर्भर म्हणायचं की लाचार?”, विशालचा मोदींना सवाल


मोदींच्या आत्मनिर्भर अभियानावरून प्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल दादलानीने प्रश्न उपस्थित केला आहे.


करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. करोना भारतात संधी घेऊन आला आहे, असं मोदींनी म्हटलं. मोदींच्या या आत्मनिर्भर अभियानावरून प्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल दादलानीने प्रश्न उपस्थित केला आहे. "ज्यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केला त्यांना आत्मनिर्भर म्हणायचं की मजबुरी म्हणायची की लाचार म्हणायचं", असा सवाल त्याने मोदींना केला.


विशालने ट्विट करत मोदींच्या आत्मनिर्भर अभियानावर निशाणा साधला. "ज्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसोबत शहरापासून ते गावापर्यंतचं अंतर पायी प्रवास करत कापण्याचा निर्धार केला, त्याच्यापेक्षा जास्त आत्मनिर्भर कोण आहे? आता ही आत्मनिर्भरता आहे की मजबुरी आहे की लाचारी?", असे प्रश्न त्याने मांडले.


लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हा रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बसला. काम नाही, पैसा नाही, राहायला घर नाही म्हणून अखेर या मजुरांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. गावी जाण्यासाठीही कोणतीही सुविधा नाही म्हणून अनेकांनी पायीच प्रवास सुरू केला. यावरून विशालने सरकारला टोला लगावला आहे.


***