“…म्हणून अंत्यविधीला २० जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी” : संजय राऊत


अंत्यविधीला २० पेक्षा अधिक लोक सहभागी होण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.


सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या करोनाग्रस्तांची संख्या ५९ हजारांवर पोहोचली आहे. तर करोनामुळे अनेक जणांना आपलं जीवही गमवावे लागले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. लॉकडाउनच्या गाइडलाइन्सनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास निघणाऱ्या अंत्ययात्रेला २० जणांपेक्षा अधिक लोकांना परवानगी नाकारण्या त आली आहे. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारनं मद्यविक्रीलाही परवानगी दिली आहे. त्यानंतर देशभरातील अनेक दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला.


“अंत्यविधीला केवळ वीस जणांना जमण्यास परवानगी देण्यात आली कारण त्या देहामध्ये आत्माच (spirit) नसतो. मात्र, दारूच्या दुकानांवर मात्र हजारो लोकांना परवानगी आहे कारण तिथे भरपूर आत्मा (spirits)आहेत,” असं म्हणत राऊत यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.


५ मे रोजी गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यासाठी लग्न कार्यात ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नयेत असं सांगितलं होतं. तसंच अंत्यविधीसारख्या कार्यातही २० पेक्षा अधिक लोक जमा होण्यावर निर्बंध घालण्यात आहे आहेत. तसंच लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारनं मद्यविक्रीसाठी परवानगी दिल्यानं दुकांनांसमोर मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. काही ठिकाणी तर मद्यप्रेमींची सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचं चित्रही समोर आलं होतं.
***