१,२०० मजुरांना घेऊन तेलंगण ते झारखंड अशी पहिली विशेष ट्रेन रवाना


तेलंगणमधील लिंगमपल्ली येथून झारखंडमधील हटिया येथे जाणारी पहिली लांब पल्ल्याची ट्रेन आज सोडण्यात आली. या ट्रेनमध्ये एकूण १२०० स्थलांतरीत मजूर प्रवास करत आहेत.


हैदराबाद: देशभरात करोना विषाणूचा उद्रेक आणि लॉकडाउनदरम्यान स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी तेलंगणच्या लिंगमपल्ली येथून झारखंड राज्यातील हटियासाठी पहिली ट्रेन रवाना झाली. ही ट्रेन आज पहाटे वाजून ५० मिनिटांनी सुटली. २४ डबे असलेली ही ट्रेन आज रात्री ११ वाजता झारखंडच्या हटिया येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण १२०० प्रवासी आहेत. लॉकडाउनमध्ये ही देशात पहिलीच ट्रेन रवाना झाली आहे.


आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी ही माहिती दिल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तेलंगणहून झारखंडला रवाना झालेली ही ट्रेन नॉनस्टॉप ट्रेन असणार आहे, असे अरुण कुमार म्हणाले. या ट्रेनमध्ये एकूण १२०० प्रवासी असून ती रात्री १२ वाजता हटिया येथे पोहोचेल अशी माहिती त्यांनी दिली.


मजुरांची टेस्ट आणि क्वारंटीन ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था-
झारखंड सरकारने या नॉन-स्टॉप ट्रेनद्वारे राज्यात परतणाऱ्या स्थलांतरीत मजुरांच्या चाचण्यांची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्याच प्रमाणे त्यांना क्वारंटीन ठेवण्यासाठीची तयारी करण्यात आल्याचे झारखंडमधील संबंधित शासकीय अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. देशात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर रेल्वेने मालगाडी वगळता आपल्या सर्व सेवा बंद केल्या आहेत. गेल्याच महिन्यात प्रवासी ट्रेन सुरू होत असल्याच्या अफवेने मुंबईतील वांद्र येथे मोठी गर्दी उसळली होती. मात्र, आज तेलंगण ते झारखंड अशी ट्रेन सोडण्यात आली असून या ट्रेनचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.


राज्यांकडून ट्रेन सोडण्याची मागणी-
केंद्र सरकारने ज्याना करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा स्थलांतरीत मजुरांना घरी परतण्याची परवानगी दिली आहे. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना रस्तेमार्गे आपापल्या राज्यांमध्ये सोडण्यात यावे अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. यानंतर पंजाब, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांनी ट्रेन सोडण्याची परवानगी मागितली होती.
***