'गो कोरोना'चा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री ठरले 'वर्ल्ड रेकॉर्ड स्टार'


समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांना वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानाने गौरविण्यात येणार आहे.


मुंबई : कोरोनाचे संकट जगावर कोसळले आहे. साथीच्या या भयानक आजाराविरुद्ध 'गो कोरोना'चा नारा देऊन लढण्याची हिंमत देणारे तसेच लोकडाउनच्या काळात गरीब, गरजूंना अन्नधान्यासह विविध स्तरावर सतत मदत करणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने कोरोनाविरुद्ध लढणारे मानवसेवेचे जागतिक दीपस्तंभ म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुकतर्फे त्यांना ऑनलाइन गौरवपत्र नुकतेच आठवले यांना पाठविण्यात आले आहे. 


कोरोनाविरुद्धच्या लढाईत लॉकडाउन च्या काळात गरिबांची मानवसेवा कोण करीत आहे, याबाबतची पाहणी लंडनमधील बुक ऑफ रेकॉर्डतर्फे नुकतीच करण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवर लॉकडाउनच्या काळात करीत असलेल्या समाजसेवेची माहिती घेण्यात आली आहे. त्यात उत्कृष्ट सामाजिक सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 ही डिक्शनरी प्रकाशित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.


समाजसेवा करणारे स्वयंप्रकाशित  दिशादर्शक तारे म्हणून या मान्यवरांना वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानाने गौरविण्यात येणार आहे. याबाबतचा समारंभ लॉकडाउन संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये लंडन येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती वर्ल्ड रेकॉर्ड बुकचे भारतातील प्रमुख अॅड. संतोष शुक्ला यांनी दिली. 


लॉकडाउनच्या काळात उत्कृष्ट समाजसेवा केल्याबाबाबत भारतात राजकीय नेते लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची वर्ल्ड रेकॉर्ड बुकतर्फे स्टार 2020 या बहुमानासाठी सर्वप्रथम निवड झाली आहे. याबाबतचे ऑनलाइन प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड बुकतर्फे पाठविण्यात आले आहे. रामदास आठवले यांनी सर्वप्रथम 'गो कोरोना'चा नारा दिला तो नारा जगभर गाजला. 


गरिबांचे मदतगार म्हणून नोंद


लॉकडाउनच्या काळात त्यांनी आपल्या निवासस्थानी सतत गरिबांना अन्नदान देणे सुरू ठेवले आहे. दिल्ली, पुणे, आसाम, मणिपूर आदी अनेक ठिकाणी रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पक्षातर्फे गरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची मदत केली जात आहे. लॉकडाउनच्या काळात गरिबांचे मदतगार म्हणून रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. याबाबतचा अहवाल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच सादर करण्यात येणार आहे, असे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे कळविण्यात आले आहे.
***