विशेष रेल्वेत घेतली गेलेली काळजी विमानात शक्य नाही कारण...


नवी दिल्ली : येत्या २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होत आहे. परंतु, या दरम्यान करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वेत घेतली गेलेली काळजी विमानामध्ये मात्र घेता येणार नसल्याचं समोर आलंय. उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशांतर्गत सुरु होणाऱ्या उड्डाणांच्या गाईडलाईन्स संदर्भात माहिती दिली. विमान सेवा सुरु होतेय परंतु या दरम्यान मधलं आसन मात्र रिकामं ठेवता येणार नाही. त्यामुळे, उड्डाणा दरम्यान प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगआणि सुरक्षेची काळजी स्वत:च घ्यावी लागणार आहे. 


विमानांच्या उड्डाणादरम्यान मधलं आसन रिकामं ठेवता येणार नाही. प्रत्येक उड्डाणानंतर विमान डिसइन्फेक्ट केलं जातं. प्रवाशांसाठी आणि क्रू मेम्बर्ससाठी योग्य ती काळजी घेतली जाते. मधलं आसन रिकामं ठेवलं तर त्याचा भार प्रवाशांच्या खिशावर पडेल, असंही हरदीप सिंह पुरी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. विमान उड्डाणांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवलं जाईल, असा विश्वासही पुरी यांनी प्रवाशांना दिलाय. 


विमान उड्डाणादरम्यान प्रवाशांसाठी गाईडलाईन्स... 


>> आपल्या सुरक्षेसाठी प्रवाशांना सुरक्षा गिअरसहीत फेस मास्क परिधान करणं आवश्यक असेल. 


>> सॅनिटायझरची बाटलीही प्रवाशांनी सोबत बाळगावी. प्रवासादरम्यान कुणालाही जेवण दिलं जाणार नाही. पानी आसनावर मिळेल. 


>> विमानात केबिन क्रूला संपूर्णत: सुरक्षा उपकरणं पुरविली जातील. 


>> चेक इन करताना केवळ एक बॅग घेऊन जाण्याची परवानगी प्रवाशांना देण्यात आलीय. 


>> विमानाच्या उड्डाणाच्या वेळेपूर्वी दोन तास अगोदर प्रवाशांना विमानतळावर पोहचावं लागेल. 


>> एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं (AAI)प्रवाशांना आपल्या मोबाईल अॅपमध्ये आरोग्य सेतू मोबाईल अॅप इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिलाय. या अॅपशिवाय प्रवाशांना टर्मिनल भवनात प्रवेश दिला जाणार नाही


>> प्रवासा दरम्यान आरोग्य सेतू अॅप्लिकेशन इन्स्टॉल असल्याशिवाय त्याचं स्टेटसही ग्रीन असायला हवं. तेव्हाच एअरपोर्ट टर्मिनलवर प्रवाशांना प्रवेश मिळेल


>> टर्मिनलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांना थर्मल तपासणीमधून जावं लागेल


***